पुढारी ऑनलाईन डेस्क | Mohammed Shami : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून पूर्णपणे बरा होत असून, त्याने नेटमध्ये सराव सुरु केला आहे. यामुळे तो लवकरच टीम इंडियाच्या जर्सीमध्ये लवकरच खेळताना दिसू शकतो. शमीला गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. दुखापतीमुळे शमीवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. सध्यो तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निरीक्षणाखाली सराव करत आहे. दुखापतीमुळे शमीला आयपीएल 2024 T20 विश्वचषकापासून दूर रहावे लागले होते.
दुखापतीमुळे अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर राहिलेला शमी पुनरागमनाची जोरदार तयारी करत आहे.शमीने सरावाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये तो नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. तो दुखापतीतून सावरत आहे. शमी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यापूर्वी फॉर्ममध्ये येण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून शमी भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारत बांगलादेशमध्ये दोन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिका होणार आहे.
गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात शमी जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने सात सामन्यांत एकूण 24 बळी घेतले आणि भारताच्या उत्कृष्ट कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला दुखापत झाली. यामुळे शमीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली. शमीच्या अनुपस्थितीत, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी T20 विश्वचषकात चांगली कामगिरी केली आणि एकूण 32 विकेट घेतल्या.