Team India Semifinal T20 World Cup: टी20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 फेरीला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होत असताना क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आलं आहे. आठ संघांमधून फक्त चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारताबाबत पाकिस्तानच्या एका दिग्गज खेळाडूने धक्कादायक भविष्यवाणी केली आहे.
माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने दावा केला की, भारत यावेळी सेमीफायनलपर्यंतही पोहोचू शकणार नाही. म्हणजेच सुपर-8 मध्येच टीम इंडियाचा प्रवास संपेल, असं आमिरचं म्हणणं आहे.
ICC T20 World Cup 2026 मध्ये भारत हा यजमान आणि गतविजेता संघ आहे. ग्रुप स्टेजमध्ये चारही सामने जिंकत भारताने दमदार कामगिरी केली असून तो स्पर्धेतील दमदार संघ मानला जातो. तरीही आमिरने भारताच्या सेमीफायनलच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
एका टीव्ही चर्चेदरम्यान आमिर म्हणाला की, पाकिस्तानविरुद्धचा सामना सोडला तर भारताची फलंदाजी इतर सामन्यांत फारशी प्रभावी वाटली नाही. त्याच्या मते, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज सध्या ज्या पद्धतीने खेळत आहेत, ते कोणत्याही संघाला हरवू शकतात. त्यामुळे भारतासाठी सुपर-8 फेरी सोपी नसेल, असा इशाराही त्याने दिला आहे.
यंदा सुपर-8 मधील ग्रुप-1 अत्यंत मजबूत मानला जातो. भारतासोबत झिम्बाब्वे, साउथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघांचा यात समावेश आहे. या चौघांनीही ग्रुप स्टेजमध्ये जवळपास सर्व सामने जिंकले आहेत, त्यामुळे पुढचा प्रत्येक सामना निर्णायक असणार आहे.
दरम्यान, सुपर-8 मध्ये भारताचा पहिला सामना 22 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये साउथ आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 26 फेब्रुवारीला चेन्नईत झिम्बाब्वेशी लढत आणि 1 मार्चला कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना खेळला जाणार आहे. सेमीफायनलमध्ये थेट प्रवेशासाठी टीम इंडियाला किमान दोन सामने जिंकणं अनिवार्य आहे.
एकीकडे भारत विजय मिळवत आहे, तर दुसरीकडे आमिर सारख्या माजी खेळाडूंच्या भाकितांमुळे दबाव वाढताना दिसत आहे. आता मैदानावरची कामगिरीच ठरवेल की, ही भविष्यवाणी खरी ठरणार की टीम इंडिया पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये जाणार.