Lionel Messi : अर्जेंटिनाने साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकत 32 संघांच्या फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. Pudhari
स्पोर्ट्स

Lionel Messi : २०३० चा फिफा विश्वचषक खेळणार की नाही? लिओनेल मेस्सीने सोडलं मौन

अर्जेंटिनाने साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकत 32 संघांच्या फेरीतील स्थान जवळपास केले निश्चित

पुढारी वृत्तसेवा

Lionel Messi 2030 world cup : फिफा विश्वचषक स्पर्धेचा थरार शिगेला पोहोचला असून, दिग्गज संघांसोबतच स्टार खेळाडूंची चर्चा जगभरात रंगली आहे. यातच सध्या सर्वाधिक चर्चेत आहे तो अर्जेंटिनाचा जादूगार लिओनेल मेस्सी! हा त्याचा कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असेल, अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता थेट २०३० च्या फिफा विश्वचषकात खेळण्याबाबत मेस्सीने स्वतः मौन सोडलं असून, त्याच्या एका वक्तव्याने फुटबॉल जगतात खळबळ उडवून दिली आहे.

लिओनेल मेस्‍सी @18

अर्जेंटिनाच्या फिफा विश्वचषक 2026 मोहिमेला अवघे दोन सामने झाले असले तरी लिओनेल मेस्सीची जादू आधीच चाहत्यांवर मोहिनी घालत आहे. अर्जेंटिनाने केलेले सर्व पाच गोल मेस्सीच्या खात्यात जमा झाले आहेत. अल्जेरियाविरुद्ध हॅट्ट्रिक केल्यानंतर 38 वर्षीय मेस्सीने ऑस्ट्रियाविरुद्ध आणखी दोन गोल करत फिफा विश्वचषकातील एकूण 18 गोलांचा टप्पा गाठला. हा विश्वविक्रम ठरला आहे.

मेस्‍सीने केले होते २००६ विश्‍वचषक स्‍पर्धेत पदार्पण

मेस्सीसाठी हा सहावा विश्वचषक आहे. त्याने 2006 मध्ये जर्मनी येथे झालेल्या विश्वचषकातून या स्पर्धेत पदार्पण केले होते. 2022 मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला होता. मेस्सीच्या चाहत्यांना तो आणखी अनेक वर्षे खेळताना पाहायचे असले, तरी 2030 मध्ये स्पेनमध्ये होणाऱ्या पुढील विश्वचषकावेळी तो 42 वर्षांचा असेल. त्यामुळे तो तेव्हा खेळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

२०३० विश्वचषक खेळण्याची शक्यता मेस्सीने नाकारली नाही

२०२६ च्या विश्वचषकातील 'ग्रुप जे' (Group J) मधील दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाने ऑस्ट्रियावर २-० अशी मात केली. या विजयानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मेस्सीला या स्पर्धेच्या आगामी शताब्दी आवृत्तीत (२०३० च्या विश्वचषकात) खेळण्याबाबत विचारण्यात आले. वृत्तासंस्‍था एएनआय'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, मेस्सी म्हणाला. "खरं सांगायचं तर, मी सध्या तरी त्याबद्दल विचार करत नाहीये. ती गोष्ट अजून बरीच लांबची वाटतेय, पण मी आधी म्हटल्याप्रमाणे, मी प्रत्येक दिवस जसा येईल तसा जगतोय आणि सध्या फक्त वर्तमानावरच माझं लक्ष केंद्रित आहे. मी अजून काही काळ खेळत राहीन. जोपर्यंत मी संघासाठी योगदान देऊ शकतो, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त वाटते आणि सहकाऱ्यांना मदत करू शकतो, तोपर्यंत मी खेळत राहणार आहे."

यंदाच्‍या विश्‍वचषकात अर्जेंटिनाची दमदार सुरुवात

गतविजेता अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक 2026 मध्ये शानदार सुरुवात केली आहे. गट जे मधील पहिले दोन्ही सामने जिंकत संघाने 32 संघांच्या फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.अर्जेंटिनाने अल्जेरियावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोहिमेला सुरुवात केली. या सामन्यात मेस्सीने हॅट्ट्रिक करत स्पर्धेवर आपली छाप उमटवली.त्यानंतर ऑस्ट्रियाविरुद्ध 2-0 असा विजय मिळवत अर्जेंटिनाने पुढील फेरीतील स्थान निश्चित केले. या सामन्यात मेस्सीने दोन गोल केले आणि विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक 18 गोल करणारा खेळाडू बनला.पात्रता निश्चित झाल्यानंतर आता अर्जेंटिनासमोर जॉर्डनविरुद्धचा अखेरचा साखळी सामना आहे. या सामन्यात संघ व्यवस्थापनाला काही खेळाडूंना विश्रांती देण्याची आणि बाद फेरीपूर्वी संघातील संयोजन तपासण्याची संधी मिळू शकते.

मेस्सीचा गौरवशाली प्रवास

लिओनेल मेस्सीने बुधवारी (२४ जून) ३९ वा वाढदिवस साजरा केला. अर्जेंटिनातील रोसारियो, सांता फे येथे एका सामान्य कुटुंबात मेस्‍सीचा जन्‍म झाला. अर्जेंटिना संघाकडून खेळताना त्याने 2005 अंडर-20 विश्वचषक, 2008 बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक, 2021 कोपा अमेरिका, 2022 फायनालिसिमा, 2022 फिफा विश्वचषक आणि 2024 कोपा अमेरिका अशी अनेक प्रतिष्ठेची विजेतेपदे जिंकली आहेत.

मेस्‍सीचा बार्सिलोनापासून इंटर मियामीपर्यंत दमदार प्रभाव

सुमारे दोन दशके बार्सिलोनाकडून खेळताना मेस्सीने अभूतपूर्व यश मिळवले. त्याने अनेक ला लिगा, कोपा डेल रे, यूईएफए चॅम्पियन्स लीग, यूईएफए सुपर कप आणि फिफा क्लब विश्वचषक विजेतेपदे जिंकत क्लबच्या आधुनिक इतिहासातील सर्वात प्रभावशाली खेळाडू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. बार्सिलोना सोडल्यानंतरही पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) कडून खेळताना त्याने 2022 आणि 2023 मध्ये लीग 1 तसेच 2022 मध्ये फ्रेंच सुपर कप जिंकला. यानंतर तो इंटर मियामीमध्ये दाखल झाला. तेथे2023 मध्ये लीग्स कप, 2024 मध्ये सपोर्टर्स शिल्ड आणि 2025 मध्ये एमएलएस कप जिंकत विविध खंड आणि लीगमध्ये आपला प्रभाव कायम ठेवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT