लिओनेल मेस्सीने रविवारी वानखेडे स्‍टेडियमवर झालेल्‍या कार्यक्रमात भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री याला आपली जर्सी भेट दिली.  image X
स्पोर्ट्स

Messi GOAT tour India : मेस्सीचा मुंबई भेटीतील 'तो' खास क्षण सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल, 'वानखेडे'वर काय घडलं?

मुंबईतील मेस्सीच्या चाहत्यांसाठी रविवार ठरला अविस्मरणीय

पुढारी वृत्तसेवा

  • वानखेडे स्टेडियमवर मेस्सीने घेतली सचिन तेंडुलकर आणि सुनील छेत्री यांची सदिच्छा भेट

  • अर्जेंटिनाची जर्सी भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीला दिली भेट

  • मेस्सी आज राजधानी दिल्लीत एका प्रदर्शनीय सामन्यात लावणार हजेरी

Messi GOAT tour India

मुंबई : सर्वकालीन सर्वोत्तम फुटबॉलपटू अशी ख्याती असलेल्या लिओनेल मेस्सीचे रविवारी (दि. १४) मुंबईतील चाहत्यांनी अभूतपूर्व असे स्वागत केले. वानखेडे स्टेडियमवर झालेला कार्यक्रम हजारो चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरला. मात्र या संपूर्ण कार्यक्रमात मेस्सी आणि भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री यांच्या भेटीचा क्षण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोलकातामधील गोंधळानंतर मुंबईत झाला शानदार कार्यक्रम

मेस्सी १३ डिसेंबर रोजी भारतात दाखल झाला, परंतु त्याच्या दौऱ्याची सुरुवात गोंधळात झाली. कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये आयोजित दोन तासांच्या कार्यक्रमात मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत असलेल्या चाहत्यांचा संयमाचा बांध फुडला. चाहत्यांनी गोंधळ घातला तोडफोड केली. यामुळे मेस्सीच्या कोलकाता दौऱ्याला गालबोट लागले. मात्र यानंतर हैदराबादमध्ये झालेला कार्यक्रम सुरळीत पार पडला. मेस्सी, इंटर मियामीचे त्याचे सहकारी लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल यांच्यासह हैदराबादला पोहोचला. येथे त्‍यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. यानंतर 'जी.ओ.ए.टी. पेनल्टी शूटआऊट'मध्ये भाग घेतला. रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मेस्सीचे अभूतपूर्व स्वागत झाले. अत्यंत दिमाखदार कार्यक्रमात चाहत्यांना मेस्सीबरोबर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यांचा मेस्सीबरोबरचा संवाद पाहण्यास मिळाला.

मेस्सीने भारतीय फुटलबॉलपटू छेत्रीला दिली आपली जर्सी भेट

वानखेडे स्टेडियमवर मुंबईतील चाहत्यांसाठी एक शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला, जिथे मेस्सीने क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि भारतीय फुटबॉल आयकॉन सुनील छेत्री यांच्याशी सदिच्छा भेट घेतली. मेस्सीने आपल्या भारत जी.ओ.ए.टी. (G.O.A.T.) दौऱ्यादरम्यान भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीला आपली जर्सी भेट दिली. तर सचिनने मेस्सीला आपली २०११ वर्ल्ड कप विजेती जर्सी भेट दिली आणि मेस्सीनेही त्याला अर्जेंटिनाच्या २०२२ वर्ल्ड कप विजयात वापरलेल्या फुटबॉलची प्रतिकृती देऊन प्रतिसाद दिला. मात्र, सर्वात मोठा जल्लोष तेव्हा झाला जेव्हा मेस्सीने आपली अर्जेंटिनाची जर्सी भारताचा महान फुटबॉलपटू असलेल्या सुनील छेत्रीच्या हवाली केली. मेस्सीने यावेळी सुनील छेत्रीला आलिंगन दिले. ही 'ग्रेट भेट' सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लिओनेल मेस्सी आज दिल्लीत

दरम्यान, मेस्सीचा दौरा १५ डिसेंबर रोजी दिल्लीत संपणार आहे. मायदेशी परतण्यापूर्वी मेस्सी राष्ट्रीय राजधानीत विराट कोहली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. तो अरुण जेटली स्टेडियमवर एका प्रदर्शनीय सामन्यातही हजेरी लावणार आहे. दुपारी दीड वाजता हा सामना होण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांना सकाळी साडेअकरा वाजल्यापासूनच स्टेडियममध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली उपस्थित राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT