इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज मार्क वुड Pudhari
स्पोर्ट्स

Mark Wood | "आजारी असूनही खेळ, प्रायव्हेट जेट पाठवतो" ; इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाचा IPL संघ मालकाबाबत खळबळजनक खुलासा

Mark Wood IPL private jet offer| आजारपणात माझ्या देखरेखीसाठी त्यांनी अनेक डॉक्टरांची फौजही तैनात केली

पुढारी वृत्तसेवा

Mark Wood IPL private jet offer

इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज मार्क वुड याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) बाबत एक मोठा दावा केला आहे. वुडने आयपीएलची अशी एक 'इनसाइड स्टोरी' सांगितली आहे, जी ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. आयपीएल दरम्यान एकदा प्रचंड ताप असतानाही, संघ मालकाने त्याला खेळण्यासाठी चक्क प्रायव्हेट जेटची ऑफर दिली होती, असे वुडने उघड केले आहे.

ताप आला होता, खेळण्‍यासाठी संघ मालकाने दिली होती विशेष ऑफर

बीबीसीच्या 'स्ट्रॅटेजिक टाइमआउट' या पॉडकास्टमध्ये बोलताना मार्क वुडने सांगितले की, एका आयपीएल सामन्यापूर्वी त्याला खूप ताप आला होता. मात्र, आपल्या प्रमुख खेळाडूने मैदानात उतरावे यासाठी फ्रेंचाइजी मालकाने त्याला एक विशेष ऑफर दिली. वुडने कोणत्याही मालकाचे नाव न घेता सांगितले की, "त्यांनी मला सामन्यासाठी येण्याकरिता प्रायव्हेट प्लेन पाठवण्याची तयारी दर्शवली होती. इतकेच नाही तर सामना संपल्यानंतर तातडीने दुसऱ्या प्रायव्हेट प्लेनने मला परत पाठवण्याची सोय केली होती, जेणेकरून मला आरामात रिकव्हरी करता येईल. आजारपणात माझ्या देखरेखीसाठी त्यांनी अनेक डॉक्टरांची फौजही तैनात केली होती."

"मालक दर अर्ध्या तासाला प्रकृतीची विचारपूस करायचे"

आपल्या अनुभवाबद्दल बोलताना वुड म्हणाला, "साधारण पाच सामन्यानंतर माझी तब्येत बिघडली होती आणि पुढचा सामना तीन दिवसांनी होता. दर अर्ध्या तासाला डॉक्टर माझ्या खोलीत येऊन माझी तपासणी करत असत. मला आठवतेय, एक दिवस मालकांनी मला फोन करून विचारले, 'कसे वाटतेय? खेळण्यासाठी तयार आहेस का?' मी त्यांना स्पष्ट सांगितले की, मी काहीही खाल्लेले नाही आणि साधे अंथरुणातून उठूही शकत नाही. त्यावर त्यांनी सांगितले की आम्ही तुझ्यासाठी दुसरे डॉक्टर बोलावू आणि सर्व सोयी करू."

वडिलांच्या सल्ल्यानुसार तो धोका पत्करला नाही

दुसऱ्या दिवशी मालकांनी पुन्हा फोन केला आणि प्रायव्हेट प्लेनची ऑफर दिली. वुडच्या सांगण्यानुसार, "मालक म्हणाले की, मी तुझ्यासाठी प्रायव्हेट प्लेन पाठवतो, तू फक्त विमानात बसून ये आणि सामना खेळ. त्यानंतर त्याच विमानाने मी तुला थेट तुझ्या बेडपर्यंत परत आणून सोडण्याची व्यवस्था करेन." वुडने सांगितले की, त्याला ही ऑफर स्वीकारायची होती, परंतु वडिलांच्या सल्ल्यानुसार त्याने तो धोका पत्करला नाही.

मार्क वुड कोणत्या संघांसाठी खेळला आहे?

मार्क वुड आपल्या आयपीएल कारकिर्दीत २०१८: चेन्नई सुपर किंग्स (CSK) - १ सामना तर २०२३मध्‍ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) - ४ सामने (यात त्याने ११ विकेट्स घेतल्या होत्या) लखनऊकडून खेळतानाच तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे ही 'प्रायव्हेट जेट'ची ऑफर नेमकी कोणत्या संघाच्या मालकाने दिली होती, याबाबत आता क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT