अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा फिरकीपटू मानव सुथार आता काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना दिसणार आहे. Pudhari
स्पोर्ट्स

Manav Suthar : पदार्पणातच धमाका! मानव सुथारला इंग्लंडमधून ऑफर, काउंटी क्लबसोबत करार निश्चित

Manav Suthar Warwickshire : करारासंदर्भात 'वॉरिकशायर'ने केली अधिकृत घोषणा

पुढारी वृत्तसेवा

Manav Suthar signs with Warwickshire County Cricket Club : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा फिरकीपटू मानव सुथार आता काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने इंग्लंडचा प्रसिद्ध काउंटी क्लब 'वॉरिकशायर'सोबत काउंटी चॅम्पियनशिपच्या पुढील दोन सामन्यांसाठी (राउंड) अल्पकालीन करार (Short term deal) केला आहे. क्लबने बुधवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.

पहिल्‍या कसोटीमध्‍ये मानवने घेतल्‍या सात विकेट

२३ वर्षांच्या सुथारने आपल्या पदार्पणाच्याच कसोटी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ७ विकेट्स घेतल्या. यात पहिल्या डावात अवघ्या ३३ धावा देत ६ बळी घेण्याच्या कामगिरीचाही समावेश आहे. त्याच्या या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि ३०० धावांनी पराभव करत कसोटी इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला.

२९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १२९ विकेट्स

पहिल्याच सामन्यातील या दमदार कामगिरीमुळे मानव सुथारला ही मोठी संधी मिळाली आहे. वॉरिकशायरच्या यॉर्कशायर आणि सोमरसेटविरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी तो उपलब्ध असेल. भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यापूर्वी त्याने २९ प्रथम श्रेणी (First Class) सामन्यांमध्ये १२९ विकेट्स घेतल्या आहेत. सुथारच्या येण्याने आमच्या गोलंदाजीला अधिक धार येईल, असा विश्वास वॉरिकशायर क्लबने व्यक्त केला आहे. तर, "या हंगामाची (सीझन) शानदार सुरुवात करणाऱ्या संघासोबत जोडला गेल्याने मी अत्यंत उत्सुक आहे," अशी प्रतिक्रिया सुथारने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

कसोटी क्रिकेट हेच माझे सर्वस्व: मानव सुथार

कसोटी सामन्यानंतर 'जिओ हॉटस्टार'शी बोलताना सुथार म्हणाला होता की, "मी ज्या दिवसापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून कसोटी क्रिकेट हेच माझ्यासाठी सर्वस्व राहिले आहे. हा या खेळाचा सर्वोच्च स्तर आहे. त्यामुळे मी अंडर-१९ क्रिकेट खेळत असो वा रणजी ट्रॉफी, भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे हेच माझे नेहमीच ध्येय होते. पदार्पणाच्या वेळी कॅप देताना कुलदीप (यादव) भाईंनी सांगितलेले शब्द खूप प्रेरणादायी होते. सर्वांनीच माझा उत्साह वाढवला, त्यामुळे हा क्षण माझ्यासाठी खरोखरच खूप खास होता."

पदार्पणाचा क्षण अत्‍यंत अभिमानाचा

"मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सर आणि कर्णधार शुभमन गिल यांनी मला सांगितले की मी या सामन्यात पदार्पण करणार आहे. तो माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण होता. कारण मी क्रिकेट खेळायला लागल्यापासून हे माझे, माझ्या वडिलांचे आणि आम्हा सर्वांचे स्वप्न होते की मी भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळावे."

आयपीएल दरम्‍यानही केला लाल चेंडूने सराव

या वर्षी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या सुथारने सांगितले की, त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याच्या संधीसाठी स्वतःला तयार ठेवायचे होते, म्हणूनच तो आयपीएल दरम्यानही लाल चेंडूने सराव करत होता. "जेव्हा संघात माझे नाव आले, तेव्हा आयपीएल सुरू असतानाही मी लाल चेंडूने सराव करत होतो आणि विचार करत होतो की संधी मिळाली तर मी कशी कामगिरी करेन," असेही सुथारने म्‍हटलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT