M S Dhoni IPL Retirement
यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये सर्वात नामुष्कीजनक कामगिरी करणारा संघ, अशी चेन्नई सुपर किंग्ज संघाची ओळखी झाली आहे. संघाचा स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी याची निवृत्तीही गेल्या काही हंगामात चर्चेचा विषय बनली आहे. यंदाही धोनी त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे तो निवृत्त केव्हा होणार?, असा सवाल माजी क्रिकेटपटूही करु लागले आहेत. बुधवारी (दि. ७ मे) कोलकाता नाईट रायडर्सवर चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला. यानंतर धोनीचे निवृत्तीच्या चर्चेवर उत्तर दिले.
बुधवारी झालेल्या सामन्यावेळीही ईडन गार्डन्सवर धोनीचे भव्य स्वागत करण्यात आले. सीएसकेच्या जर्सीत असलेल्या चाहत्यांनी 'धोनी... धोनी...' असा जयघोष केला. सामन्यानंतरच्या बोलताना धोनीने चाहत्यांचे आभार मानले. आयपीएलच्या संभाव्य निवृत्तीबद्दल मौन सोडताना ताे म्हणाला की, "मला वाटतं की चाहत्यांकडून मला हेच प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे. विसरू नका, मी ४३ वर्षांचा आहे म्हणून मी बराच काळ खेळलो आहे. मला वाटतं की, बहुतेकांना हे माझं शेवटचं वर्ष कधी असेल हे माहित नाही म्हणून ते मला पाठिंबा देतात, मला खेळताना पाहणे त्यांना आवडते. खेळताना पाहू इच्छितात.
सध्या तरी माझ्याकडे निर्णय घेण्यासारखे काही नाही हा दोन महिन्यांचा कालावधी आहे आणि त्यानंतर मला आणखी ६-८ महिने कठोर परिश्रम करावे लागतील आणि शरीर दबाव सहन करू शकेल की नाही हे पाहावे लागेल. सध्या तरी मला निर्णय घेण्यासारखे काही नाही," असेही धोनीने स्पष्ट केले.
आमचे ध्येय स्पर्धात्मक असणे आणि पुढील वर्षी खेळ कसा उंचावेल याकडे पाहणे आहे. आजच्या सामन्यात बऱ्याच गोष्टी बरोबर झाल्या. आम्हाला अधिक स्पर्धात्मक व्हायचे आहे पण पुढच्या वर्षीही पाहायचे आहे. आम्हाला योग्य संयोजन, परिस्थितीनुसार कोणता गोलंदाज कोणती षटके टाकू शकतो याचाही विचार करायचा आहे. आधी फलंदाजीचा क्रम योग्य नव्हता पण आता फलंदाजांमध्ये खरोखरच क्रम योग्य आहे, असेही धोनीने यावेळी सांगितले.
बुधवारी (7 मे) इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला 2 विकेटस्ने पराभूत केले. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने कोलकाताला पराभूत करत अखेर तिसर्या विजयाची नोंद केली आहे. चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपले आहे; पण त्यांच्या विजयामुळे आता कोलकाताची वाट बिकट झाली आहे. ‘केकेआर’ सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांचे 2 सामने बाकी आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त 15 गुण मिळवण्याची संधी आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर कोलकाताला पुढचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.
कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 179 धावा केल्या. कोलकाताकडून कर्णधार अजिंक्य रहाणने 33 चेंडूंत सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. आंद्रे रसेलने 38 धावांची खेळी केली. मनिष पांडेने नाबाद 36 धावा केल्या, तर सुनील नारायणने 26 धावांची खेळी केली.180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने 19.4 षटकांत 8 विकेटस् गमावत 183 धावा केल्या. या सामन्यात चेन्नईकडून आयुष म्हात्रे आणि डेवॉन कॉनवे ही नवीन सलामी जोडी मैदानात उतरली होती; पण दुसर्याच चेंडूवर आयुषला वैभव अरोराने शून्यावर माघारी धाडले. तर दुसर्या षटकात कॉनवेला मोईन अलीने शून्यावर त्रिफळाचीत केले; पण तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या उर्विल पटेलने पहिल्या षटकापासूनच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्याचाही अडथळा तिसर्या षटकात हर्षित राणाने दूर केला. उर्विलने 11 चेंडूंत 1 चौकार आणि 4 षटकारांसह 31 धावा केल्या. आर. अश्विन 8 धावा करून बाद झाला.
रवींद्र जडेजाही 10 चेंडूंत 19 धावा करून त्रिफळाचीत झाला. त्यामुळे पॉवरप्लेच्या 6 षटकांतच चेन्नईने 60 धावांवर 6 विकेटस् गमावल्या होत्या; पण नंतर डेवाल्ड ब्रेव्हिस आणि शिवम दुबे यांची जोडी जमली. दुबेने एक बाजू सांभाळली असताना ब्रेव्हिसने आक्रमण केले. त्याने वादळी फटके मारताना अर्धशतक केले; पण अर्धशतकानंतर त्याला 13 व्या षटकात वरुण चक्रवर्तीने रिंकू सिंगच्या हातून झेलबाद केले. त्याने 25 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 52 धावांची खेळी केली. त्यानंतर दुबेने जबाबदारी खांद्यावर घेतली. मात्र, चेन्नई विजयाच्या जवळ असताना शिवम दुबे 19 व्या षटकात 40 चेंडूंत 45 धावा करून बाद झाला. याच षटकात नूर अहमदही 2 धावांवर बाद झाला. शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 8 धावांची गरज होती. यावेळी एम. एस. धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकात ठोकला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर अंशुल कंबोजने चेन्नईसाठी विजयी चौकार मारला.