स्पोर्ट्स

Messi Magic... पदार्पणाच्या ४७ सेकंदांत रेड कार्ड ते विश्वविजेतेपदाचे सर्वोच्च शिखर

Lionel Messi retirement : अर्जेंटिनाच्या प्रेमासाठी आयुष्य वेचणाऱ्या मेस्सीची डोळ्यात पाणी आणणारी 'निवृत्ती'

रणजित गायकवाड

ब्युनॉस आयर्स : डोळ्यांत अश्रूंचा महापूर, छातीवर अर्जेंटिनाची अभिमानास्पद निळी-पांढरी जर्सी आणि मनात एका युगाचा अंत झाल्याची असह्य वेदना... ज्या पायांनी दोन दशके फुटबॉलच्या मैदानावर जादूचे साम्राज्य उभे केले, त्या पायांना अखेर थांबावे लागले आहे. अर्जेंटिनासाठी खेळताना मेस्सीने केवळ सामने जिंकले नाहीत, तर स्वतःच्याच देशाचे प्रेम आणि मान्यता मिळवण्यासाठी आयुष्यभर एक अदृश्य, भावनिक युद्ध लढले. पदार्पणातील रेड कार्डपासून सुरू झालेला हा प्रवास त्याने विश्वविजेतेपदाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचून पूर्णत्वास नेला.

अवघ्या ४७ सेकंदांत पदरी पडलेले रेड कार्ड

या महानायकाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द ज्या वळणावर सुरू झाली, ती आठवण आजही अंगावर काटा आणते. १७ ऑगस्ट २००५ रोजी बुडापेस्ट येथे हंगेरीविरुद्धच्या सामन्यात १८ व्या क्रमांकाची जर्सी घालून १८ वर्षांच्या मेस्सीने अर्जेंटिनाच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले. मैदानात उतरून अवघे ४७ सेकंद झाले असताना प्रतिस्पर्धी खेळाडूच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात मेस्सीचा हात लागला आणि रेफ्रींनी थेट 'रेड कार्ड' दाखवून त्याला बाहेर काढले. पदार्पणाच्या सामन्यात एका मिनिटाच्या आत मैदानाबाहेर फेकल्या गेलेल्या त्या नवख्या मुलाने ड्रेसिंग रूममध्ये बसून ढसाढसा अश्रू ढाळले होते. पहिल्याच सामन्यातील ते अश्रू सांगून गेले होते की, अर्जेंटिनासाठी खेळताना मेस्सीला पुढे किती मोठ्या वेदना आणि संघर्षातून जावे लागणार आहे.

बार्सिलोनाचा लाडका, पण मायदेशात मात्र संशयाचे सावट

वयाच्या १३ व्या वर्षी स्पेनला गेलेल्या मेस्सीने बार्सिलोनाला सर्व काही जिंकून दिले. तिथे त्याला बिनशर्त प्रेम मिळाले; मात्र अर्जेंटिनात त्याच्यावर सतत संशयाची नजर राहिली. दिएगो मॅराडोना यांच्या वादळी, नाट्यमय आणि आक्रमक व्यक्तिमत्त्वाची सवय असलेल्या अर्जेंटिनाच्या चाहत्यांना हा शांत, मवाळ बोलणारा आणि कॅमेऱ्यासमोर देशभक्तीचे प्रदर्शन न करणारा मेस्सी बऱ्याचदा ‘परका’ वाटायचा. संपूर्ण युरोप पादाक्रांत करणारा हा खेळाडू आपल्या देशासाठी मॅराडोनासारखा विश्वचषक का आणू शकत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जायचा.

पराभवांची मालिका, तुटलेले मन आणि पहिली निवृत्ती

मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिना सातत्याने अंतिम फेऱ्यांमध्ये पोहोचत होता, मात्र विजय हुलकावणी देत होता. २०१४ चा विश्वचषक, २०१५ ची कोपा अमेरिका आणि २०१६ ची कोपा अमेरिका शताब्दी स्पर्धा; अशा सलग तीन मोठ्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यांत अर्जेंटिनाला पराभवाचा सामना करावा लागला. २०१६ च्या फायनलमध्ये पेनल्टी हुकल्यानंतर खचलेल्या २९ वर्षीय मेस्सीने डोळ्यांत पाणी आणून ‘माझ्यासाठी राष्ट्रीय संघाचा प्रवास आता संपला आहे,’ म्हणत तडकाफडकी पहिली निवृत्ती जाहीर केली. पराभवाचे सर्व खापर एकट्या मेस्सीवर फोडणाऱ्या देशात, तो जाताच मात्र ब्यूनस आयर्सच्या रस्त्यांवर लोकांचे मोर्चे निघाले, खुद्द राष्ट्राध्यक्षांनी आणि मॅराडोना यांनी विनवणी केली, ‘लिओ, तू निवृत्ती घेऊ नकोस’ असे फलक झळकावले. अखेर देशवासीयांच्या प्रेमाखातर तो पुन्हा त्या काटेरी वाटेवर परतला.

माराकाना मैदानावरील अश्रू आणि अग्निपरीक्षेतून मुक्ती

पुनरागमनानंतर २०१८ च्या विश्वचषकातील अपयशाने जखमा आणखी ताज्या केल्या, पण १० जुलै २०२१ ची ती रात्र सर्व टीका कायमची संपवणारी ठरली. माराकाना स्टेडियमवर पारंपारिक प्रतिस्पर्धी ब्राझीलला १-० ने धूळ चारत अर्जेंटिनाने कोपा अमेरिका जिंकली. अंतिम शिट्टी वाजताच मेस्सी मैदानात गुडघ्यांवर कोसळला आणि रडू लागला. इतकी वर्षे ज्या मेस्सीने संघाला एकट्याच्या खांद्यावर ओढत पुढे नेले होते, त्या रात्री सहकाऱ्यांनी मेस्सीला डोक्यावर उचलून घेतले. २८ वर्षांनंतरचे हे जेतेपद म्हणजे त्याच्यावरील सर्व आरोपांतून झालेली कायमची मुक्ती होती.

कतारमधील अमरत्व: सुवर्ण चषकाचे ऐतिहासिक चुंबन

त्यानंतर कतारमध्ये २०२२ च्या विश्वचषकात जे घडले, ते फुटबॉलच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर मेस्सीने चमत्कार घडवला. मेक्सिकोविरुद्धचा अप्रतिम गोल, ऑस्ट्रेलिया आणि क्रोएशियाविरुद्धचे वर्चस्व आणि फ्रान्सविरुद्धच्या अविस्मरणीय फायनलमधील दोन गोल... अखेर पेनल्टीवर शुटाऊटवर विजय मिळवत मेस्सीने तो बहुप्रतिक्षित फिफा विश्वचषक उंचावला. चषकाला हातात घेण्यापूर्वी त्याने घेतलेले ते हळुवार चुंबन ही एका परिपूर्ण, अमर कारकिर्दीची साक्ष ठरली.

२०२६ चा अखेरचा लढा

२०२४ ची कोपा अमेरिका जिंकल्यानंतर, मेस्सीने २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचे नेतृत्व केले. वयाच्या ३९ व्या वर्षी आठ गोल व चार असिस्ट नोंदवून त्याने संघाला पुन्हा अंतिम फेरीत नेले; परंतु १९ जुलै रोजी स्पेनविरुद्ध अतिरिक्त वेळेत १-० असा पराभव स्वीकारावा लागला. डोळ्यांत अश्रू घेऊन त्याने ते मैदान सोडले.

या अंतिम सामन्यानंतर आणि आयुष्यभराचे आधारवड असलेले वडील जॉर्ज मेस्सी यांच्या नुकत्याच झालेल्या निधनानंतर, ३१ ऑगस्ट रोजी मेस्सीने अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा अलविदा केला. "माझे मन अत्यंत व्याकूळ झाले आहे, तरीही मला जाणीव आहे की निरोपाची हीच योग्य वेळ आहे," असे सांगत त्याने २०७ सामने, विक्रमी १२५ गोल आणि चार ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय चषकांचा दैदिप्यमान वारसा मागे ठेवून ती लाडकी जर्सी कायमची घडी करून ठेवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT