पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात 6 एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर होणारा IPL सामना सुरक्षा कारणास्तव पुढे ढकलण्याची शक्यता आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर कोलकाता पोलिसांनी आवश्यक सुरक्षा प्रदान करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे या सामन्याच्या तारखेमध्ये अथवा स्थळामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी जाहीर केले आहे की, रामनवमीच्या दिवशी संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये 20,000 हून अधिक मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागणार आहे. याच कारणामुळे कोलकात्यात होणाऱ्या IPL सामन्यासाठी पोलिसांनी सुरक्षा मंजुरी दिली नाही, अशी माहिती क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी दिली.
"पोलिसांनी स्पष्ट सांगितले आहे की ते पुरेशी सुरक्षा पुरवू शकत नाहीत. पोलिस संरक्षणाशिवाय 65,000 प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना आयोजित करणे अशक्य आहे," असे स्नेहाशिष यांनी सांगितले. या परिस्थितीबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) माहिती देण्यात आली आहे, आणि अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे. गेल्या वर्षीही रामनवमीमुळे एक IPL सामना पुढे ढकलावा लागला होता.
IPL 2025 ची सुरुवात 22 मार्च रोजी ईडन गार्डन्सवर होणार आहे, जिथे गतविजेते KKR आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी 35 मिनिटांचा भव्य उद्घाटन समारंभ आयोजित केला जाणार आहे. यामध्ये प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या जबरदस्त परफॉर्मन्सची शक्यता आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह आणि अन्य मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे."हा एक प्रतिष्ठेचा सामना आहे आणि तिकिटांसाठी मोठी मागणी आहे. ईडन गार्डन्समध्ये बर्याच वर्षांनी उद्घाटन समारंभ होणार आहे," असे स्नेहाशिष गांगुली म्हणाले. त्यांनी मात्र उद्घाटन सोहळ्याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.