पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान क्रिकेट बोर्डने भारतातील इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) सुरु केले आहे. या लीगमध्ये विदेशी खेळाडूही सहभागी होतात. मात्र जगभरातील क्रिकेटपटूंची 'आयपीएल'लाच पहिली पसंती असते. आता दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉश (Corbin Bosch) यानेही 'पीएसएल'ला सोडचिठ्ठी देत आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे भडकलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल पीसीबीने कॉर्बिन बॉशला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ( Corbin Bosch served legal notice by PCB)
कॉर्बिन बॉशला आयपीएल २०२५ साठी मुंबई इंडियन्स संघात बदली खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झल्मी संघाचा सहभागी होता; पण आयपीएलमध्ये निवड झाल्यानंतर त्याने पीएसएलमधून आपले नाव मागे घेतले आहे. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज आहे. त्याने बॉशला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
पाकिस्तान सुपर लीगचा आगामी हंगाम ११ एप्रिल ते २५ मे दरम्यान खेळला जाईल. इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्सचा लिझाड विल्यम्स दुखापतीमुळे आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी कॉर्बिन बॉशची वर्णी लागली आहे. रविवारी (दि.१७) एका प्रसिद्धीपत्रकात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, "कॉर्बिन बॉशला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आले आहे. त्याने कोणत्या कारणास्तव निर्णय घेतला याचा खुलास करण्यास सांगितले आहे. निर्धारित वेळेत त्याच्याकडून उत्तर अपेक्षित आहे."
कॉर्बिनने ८६ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ६६३ धावा केल्या आहेत आणि ५९ विकेट्स घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याचा सर्वोत्तम धावा ८१ धावा आहेत.