Riya Patil Para Swimming Gold Junior Player:
हैदराबाद येथे पार पडलेल्या २५ व्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरच्या रिया पाटील हिने दमदार कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. ही स्पर्धा १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान झाली होती. रियाने या स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकावली, तसेच तिला स्पर्धेतील 'ज्युनियर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट' हा मानाचा बहुमानही मिळाला.
रिया पाटीलने S-5 ज्युनिअर कॅटेगरीमध्ये पहिल्या दिवशी १०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर त्याच दिवशी ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक जिंकून पदकतालिकेत महाराष्ट्राचे खाते उघडले. दुसऱ्या दिवशीही तिने ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये आणखी एक सुवर्णपदक मिळवत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली.
१०० मीटर फ्रीस्टाईल - सुवर्ण पदक
५० मीटर फ्रीस्टाईल - सुवर्ण पदक
५० मीटर बॅकस्ट्रोक - सुवर्ण पदक
स्पर्धेतील सर्वोकृष्ट ज्युनिअर खेळाडू
रियाने १०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात ३.१२ मिनिटे, तर ५० मीटर बॅकस्ट्रोक १.४२ मिनिटे वेळ नोंदवत विक्रमी वेळेसह ही सुवर्णपदके जिंकली आहेत. विशेष म्हणजे, तिने यापूर्वी गुवाहाटी आणि दिल्लीत स्वतःचे राष्ट्रीय विक्रमही तोडले आहेत.
महाराष्ट्राला दुसरे स्थान: या स्पर्धेच्या पदकतालिकेत कर्नाटक राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले, तर रिया पाटीलच्या प्रभावी कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
यापूर्वीही रियाने गोवा २४ व्या नॅशनल चॅम्पियनशिप आणि गुवाहाटी येथील स्पर्धांमध्ये प्रत्येकी तीन सुवर्णपदके जिंकण्याची चमकदार कामगिरी केली आहे. कोल्हापूर पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या रियावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.