केएल राहुल इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत असून त्याच्या बॅटमधून भरपूर धावा निघत आहेत. चौथ्या कसोटी सामन्यातही त्याने झुंजार 90 धावांची खेळी साकारली होती आणि सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत त्याच्या खात्याय आतापर्यंत 511 धावा जमा झाल्या आहेत.
राहुलने केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर आतापर्यंत एकूण 249 कसोटी धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. तो केनिंग्टन ओव्हलवर सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याच्याकडे महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकण्याची संधी आहे. यासाठी त्याला केवळ 24 धावांची आवश्यकता आहे. तेंडुलकरने केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर 272 कसोटी धावा केल्या आहेत.
राहुल द्रविड : 443 धावा
सचिन तेंडुलकर : 272 धावा
रवी शास्त्री : 253 धावा
केएल राहुल : 249 धावा
गुंडप्पा विश्वनाथ : 241 धावा
केएल राहुलने आतापर्यंत इंग्लंडच्या भूमीवर एकूण चार कसोटी शतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरनेही इंग्लंडमध्ये एकूण चार कसोटी शतके नोंदवली होती. आता जर राहुलने पाचव्या कसोटीत शतक झळकावले, तर तो इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी शतके करण्याच्या बाबतीतही सचिनला मागे टाकेल.
केएल राहुलने 2014 साली भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने संघासाठी 62 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 3768 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 10 शतके आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3043 धावांची नोंद आहे.