स्पोर्ट्स

IPL पूर्वी KKR ची डोकेदुखी वाढली; बदली खेळाडूच्या शोधात संघाने ३ वेगवान गोलंदाजांना आजमावले

KKR in Trouble : तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्ससमोर हंगामापूर्वीच मोठे आव्हान उभे राहिले आहे.

रणजित गायकवाड

कोलकाता : IPL 2026 चा रणसंग्राम सुरू होण्यास आता १० दिवसांहूनही कमी कालावधी शिल्लक असताना, कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे बाहेर फेकला गेल्याने संघ व्यवस्थापन आता त्याच्या जागी योग्य पर्यायाच्या शोधात आहे.

तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्ससमोर हंगामापूर्वीच मोठे आव्हान उभे राहिले आहे. हर्षित राणाच्या दुखापतीमुळे संपूर्ण गोलंदाजी विभागाला मोठा धक्का बसला असून, फ्रँचायझीने पर्यायी खेळाडू शोधण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. याच पार्श्वभूमीवर तीन वेगवान गोलंदाजांना चाचणीसाठी पाचारण करण्यात आले.

बदली खेळाडूंच्या शर्यतीत 'हे' ३ गोलंदाज

हर्षित राणाच्या अनुपस्थितीत KKR ने सिमरजीत सिंग, के.एम. आसिफ आणि संदीप वॉरियर यांना शॉर्टलिस्ट केले आहे. टी-२० विश्वचषकाच्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना हर्षितच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो सध्या पुनर्वसनात आहे. तो मैदानात कधी परतणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याने KKR ला नाईलाजाने बदली खेळाडूचा शोध घ्यावा लागत आहे.

सिमरजीत सिंग

चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळलेल्या सिमरजीतने १४ आयपीएल सामन्यांत ११ बळी घेतले आहेत. अचूक यॉर्कर आणि वेग ही त्याची जमेची बाजू आहे.

के.एम. आसिफ

राजस्थान रॉयल्स आणि CSK कडून खेळलेला आसिफ त्याच्या वेगासाठी प्रसिद्ध आहे, मात्र त्याची फिटनेस ही नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे.

संदीप वॉरियर

KKR कडून यापूर्वी खेळलेला वॉरियर संघासाठी नवीन चेहरा नाही. त्याचा अनुभव आणि संघासोबतचे जुने संबंध पाहता त्याचे पारडे जड मानले जात आहे.

इडन गार्डन्सवरील पहिल्या सराव सत्रात आसिफ आणि वॉरियर यांनी चाचणी दिली, तर सिमरजीतने मुंबईतील कामगिरीने व्यवस्थापनाला आधीच प्रभावित केले आहे.

पाथिरानाच्या उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह

KKR च्या अडचणी इथेच संपत नाहीत. श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना याच्या खेळण्याबाबतही सस्पेन्स कायम आहे. टी-२० विश्वचषकादरम्यान त्याच्या पायाच्या स्नायूंना दुखापत झाली होती आणि अद्याप त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून 'क्लिअरन्स' मिळालेले नाही.

KKR च्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘पाथिरानाच्या संघात सामील होण्याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. आम्ही सतत संपर्कात आहोत, मात्र दररोज त्याची तिकिटे बुक आणि रद्द करावी लागत आहेत.’

सध्या KKR कडे भारतीय वेगवान गोलंदाज म्हणून वैभव अरोरा, आकाश दीप, कार्तिक त्यागी आणि उमरान मलिक यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. उमरान नुकताच पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतला आहे. दरम्यान, न्यूझीलंडचे फिन ॲलन, टिम सायफर्ट आणि रचिन रवींद्र लवकरच संघात सामील होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT