गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची अवस्था बिकट झाली. विशेषतः फलंदाजीत टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यामुळे संघावर मोठे संकट उभे राहिले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात २ दिवसांहून अधिक काळ फलंदाजी करत ४८९ धावांचा डोंगर उभा केला. या मोठ्या धावसंख्येसमोर भारतीय फलंदाजांना आपली गुणवत्ता दाखवता आली नाही.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांची अक्षरशः धूळधाण उडाली. केएल राहुल, ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यापैकी एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. भारतीय संघाने गोलंदाजीतही संघर्ष केला आणि त्यानंतर फलंदाजांनीही निराशा केली.
भारतीय फलंदाजीचे हे अपयश पाहून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची वाट पाहणारा अनुभवी फलंदाज करुण नायर याने एक 'क्रिप्टिक' पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. नायरने २४ नोव्हेंबर रोजी 'एक्स' पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘काही परिस्थितीत एक अशी भावना असते, जी तुम्ही मनातून जाणता आणि तिथे उपस्थित नसण्याची शांतता त्यात वेगळीच टोचणी निर्माण करते.’
नायरच्या पोस्टवर माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनने पोस्टवर हसणाऱ्या इमोजी शेअर केल्या, ज्यामुळे नायरच्या या 'टोमण्या'सारख्या संदेशाची चर्चा अधिक वाढली आहे.
करुण नायरचे नुकतेच तब्बल ८ वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागम झाले होते. तो इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचा सदस्य होता. त्या मालिकेत त्याला चार कसोटी सामने खेळायला मिळाले. पण त्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे त्याला लगेचच भारतीय संघातून वगळण्यात आले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत तसेच त्यानंतरच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याला संधी मिळाली नाही.
३३ वर्षीय करुण नायरने आतापर्यंत भारतासाठी १० कसोटी आणि २ वनडे सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ४१.४ च्या सरासरीने ५७९ धावा केल्या आहेत. वनडेमध्ये त्याच्या नावावर ४६ धावा आहेत. सध्याच्या कसोटी संघात टॉप ऑर्डर अपयशी ठरत असताना, नायरच्या या सूचक संदेशाने भारतीय क्रिकेटमधील निवड प्रक्रियेवर पुन्हा एकदा बोट ठेवले आहे.
भारतीय कसोटी संघातून वगळल्यानंतर नायर याने रणजी ट्रॉफी २०२५-२६ मध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. आपल्या अप्रतिम फॉर्मने निवड समितीचे लक्ष वेधण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला, मात्र या जबरदस्त कामगिरीकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.
करुण नायर, जो कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे, त्याने कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करताना रणजी ट्रॉफी २०२५-२६ मध्ये शानदार खेळ दाखवला आहे.
नायरने अवघ्या ५ सामन्यांमध्ये १०० पेक्षा जास्त सरासरी राखत ६०२ धावा ठोकल्या. ही कामगिरी कोणत्याही निवड समितीला विचार करण्यास लावणारी आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने मोठी धावसंख्या करूनही त्याला भारतीय कसोटी संघात संधी मिळाली नाही, याबद्दल आता क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.