Kartik Tyagi Bowling Action Controversy Pudhari
स्पोर्ट्स

Bowling Action: मैदानावर वादाची ठिणगी! KKR च्या खेळाडूवर 'नक्कल' केल्याचा गंभीर आरोप; चाहत्यांमध्ये संताप

Bowling Action Controversy: KKR चा गोलंदाज कार्तिक त्यागीवर इतर गोलंदाजांची नक्कल केल्याचा आरोप झाला आहे. डेल स्टेनने त्याच्या बॉलिंग अ‍ॅक्शनवर प्रश्न उपस्थित करत आत्मविश्वासावरही शंका व्यक्त केली.

पुढारी वृत्तसेवा

Kartik Tyagi Bowling Action Controversy IPL 2026: IPL 2026 च्या सुरुवातीलाच वादांची मालिका सुरु झाली असून, आता आणखी एक नवा वाद समोर आला आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात KKR चा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी सध्या चर्चेत आहे. त्यामागचं कारण म्हणजे त्याची बॉलिंग अ‍ॅक्शन. या वादाला सुरुवात झाली ती दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या वक्तव्यामुळे. त्याने सामना पाहताना कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

स्टेनने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “कार्तिक त्यागीकडे वेग आहे, कौशल्य आहे. पण तो स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवत नाही, असं वाटतं. तो इतर गोलंदाजांच्या अ‍ॅक्शनची नक्कल करत असल्यासारखं दिसत आहे.”

त्याच्या या विधानामुळे क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आलं आहे. स्टेनने पुढं सांगितलं की, सुरुवातीच्या टप्प्यात इतर खेळाडूंची नक्कल करणं चुकीचं नाही. त्यातून काही गोष्टी शिकायला मिळतात. मात्र, एका ठराविक स्तरानंतर प्रत्येक गोलंदाजाने स्वतःची वेगळी अ‍ॅक्शन आणि शैली विकसित करणं आवश्यक असतं.

या पार्श्वभूमीवर कार्तिक त्यागीची सामन्यातील कामगिरीही फारशी प्रभावी ठरली नाही. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरलेल्या त्यागीने 4 षटकांत 43 धावा दिल्या आणि फक्त 1 विकेट घेतली. त्याची इकॉनॉमी 10.75 इतकी राहिली, जी टी-20 सामन्यासाठी जास्त मानली जाते. त्याने सूर्यकुमार यादवला बाद केलं, पण त्याशिवाय इतर फलंदाजांवर नियंत्रण ठेवू शकला नाही.

एकीकडे IPL सारख्या मोठ्या मंचावर तरुण खेळाडूंवर प्रचंड दबाव असतो, तर दुसरीकडे अशा टिप्पणीमुळे खेळाडूंवर अधिक लक्ष केंद्रित होतं. स्टेनसारख्या दिग्गजाचा सल्ला सकारात्मक मानला जात असला, तरी त्यातून कार्तिक त्यागीला स्वतःचा खेळ अधिक परिपक्व करण्याची गरज अधोरेखित होते.

IPL 2026 मध्ये केवळ सामनेच नाही, तर खेळाडूंच्या शैली, तंत्र आणि कामगिरीवरही चर्चा रंगताना दिसत आहे. आता कार्तिक त्यागी या टीकेला कशा प्रकारे उत्तर देतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT