

मुंबई; वृत्तसंस्था : रायन रिकेल्टन आणि रोहित शर्माच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, गेल्या 13 हंगामांनंतर मुंबईला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यात प्रथमच यश आले आहे.
केकेआरने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित 20 षटकांत 4 बाद 220 धावांचा डोंगर रचला. मात्र, प्रत्युत्तरात मुंबईने देखील तोडीस तोड प्रत्युत्तर देत 19.1 षटकांत 4 गड्यांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले.
221 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर रिकेल्टन आणि रोहित शर्माने केकेआरच्या गोलंदाजांची पिसे काढली. या जोडीने केवळ 71 चेंडूंत 148 धावांची झंझावाती सलामी देत विजयाचा पाया रचला. रिकेल्टनने 43 चेंडूंत 81 धावांची खेळी केली. यात 8 उत्तुंग षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. दुसर्या बाजूला ‘हिटमॅन’ रोहितनेही आपल्या शैलीत फटकेबाजी करत 38 चेंडूंत 78 धावा कुटल्या. रोहितच्या या खेळीत 6 चौकार व 6 षटकारांचा समावेश होता.
प्रारंभी, अजिंक्य रहाणे-अंगक्रिश रघुवंशी यांची आक्रमक अर्धशतके आणि फिन अॅलन, रिंकू सिग यांच्या फटकेबाजीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारीत 20 षटकांत 4 बाद 220 धावांचा डोंगर रचला.
प्रारंभी, मुंबईने नाणेफेक जिंकल्यानंतर केकेआरला कमी धावसंख्येत रोखण्याच्या द़ृष्टीने प्रथम फलंदाजीला पाचारण केले. मात्र, केकेआरच्या सलामीवीरांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेताना मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अजिंक्य रहाणे व फिन अॅलन या जोडीने यावेळी अवघ्या 5.2 षटकांतच 69 धावांची जोरदार सलामी दिली. रहाणेने आपल्या 40 चेंडूंतील खेळीत 3 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी करत 67 धावा केल्या तर अॅलनने अवघ्या 17 चेंडूंत 6 चौकार, 2 षटकारांसह 37 धावा फटकावल्या.
तिसर्या क्रमांकावरील कॅमेरून ग्रीनला अवघ्या 18 धावांवर परतावे लागले. मात्र, त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या अंगक्रिश रघुवंशीने आक्रमक अर्धशतक फटकावत धावसरासरी उत्तम राहील, याची पुरेपूर काळजी घेतली. त्याने अवघ्या 29 चेंडूंतच 6 चौकार व 2 षटकारांसह 51 धावांचे योगदान दिले. रिंकू सिंग व रमणदीप यांनी शेवटच्या टप्प्यात फटकेबाजीचा पुरेपूर प्रयत्न केला.
मुंबई इंडियन्सने 19.1 षटकांत 4 बाद 224 धावा करत हे लक्ष्य गाठले. घरच्या मैदानावर मुंबईने यशस्वीरीत्या पूर्ण केलेला हा आजवरचा सर्वात मोठा पाठलाग ठरला आहे. या धडाकेबाज विजयामुळे मुंबईने आयपीएल 2026 च्या हंगामाची दमदार सुरुवात केली आहे.