1983 world cup viral bill
नवी दिल्ली : कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. लंडनमध्ये खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरले होते. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. हा फोटो एका हॉटेलच्या बिलासारखा दिसत आहे. या व्हायरल बिलाच्या आधारे असा दावा केला जात आहे की, १९८३ मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघाने रात्रीच्या पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात दारू आणि सिगारेट खरेदी केली होती. मात्र, माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य राहिलेल्या कीर्ती आझाद यांनी हे व्हायरल बिल 'फेक' (बनावट) असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या स्पर्धेत भारताकडून तीन सामने खेळले होते.
व्हायरल होत असलेल्या बिलावर 'ग्रोसवेनर हॉटेल' (Grosvenor Hotel) असे लिहिले असून त्यात अनेक गोष्टी खरेदी केल्याचा उल्लेख आहे. खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये व्हिस्की, बिअर, सिगारेट आणि ॲशट्रेचा समावेश आहे. हे टेबल 'इंडियन क्रिकेट टीम'च्या नावावर बुक करण्यात आल्याचा दावाही या बिलात केला आहे. इतकेच नाही तर या बिलावर महान क्रिकेटपटू कपिल देव यांची स्वाक्षरी (Signature) देखील आहे.
या दाव्यामागचे सत्य उघड करताना कीर्ती आझाद यांनी सांगितले की, "हे बिल पूर्णपणे बनावट आहे, कारण भारतीय संघ त्या रात्री तिथे गेलाच नव्हता. संघाने रात्रभर विजयाचा जल्लोष साजरा केला, पण ती जागा दुसरीच होती. ज्या हॉटेलमध्ये हा जल्लोष झाला, त्याचे नाव 'वेस्टमोरलँड हॉटेल' होते."
कीर्ती आझाद यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की,"हे बिल बनावट आहे. सध्या हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम्ही लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडजवळ असलेल्या 'वेस्टमोरलँड हॉटेल'मध्ये मुक्कामास होतो. २५ जून १९८३ रोजी मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर २६ जूनच्या सकाळपर्यंत रात्रभर जल्लोष सुरू होता. आम्ही त्या (व्हायरल बिलात उल्लेख असलेल्या) हॉटेलमध्ये कधी गेलोच नाही. कपिल देव यांची स्वाक्षरी देखील बनावट आहे."
माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, "काही लोक अशा बनावट गोष्टी बनवण्यात आपला वेळ वाया घालवतात आणि सोशल मीडियावर त्या जंगलातील आगीसारख्या पसरवतात, याचे मला आश्चर्य वाटते. किती विचित्र लोक आहेत, यांना दुसरं काही काम नाही का?"