Smriti Mandhana Brand Value:
भारतीय महिला क्रिकेटपटूंनी वनडे वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला. यानंतर टीम इंडियातील स्टार खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूत देखील तुफान वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाचं वर्ल्ड चॅम्पियन होणं थोडक्या हुकत होतं. मात्र यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियानं हा दुष्काळ संपवला. या विजेतेपदानंतर संपूर्ण भारतातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
त्याचबरोबर आता टीम इंडियातील स्टार खेळाडूंकडे जाहिरातींचा ओघ देखील वाढणार आहे. हीच संधी साधून भारतीय महिला क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी आपल्या जाहिरातीची फी देखील वाढवली आहे. त्यांची ब्रँड व्हॅल्यू चांगलीच वाढली आहे. प्राथमिक माहितीनुसार संघातील खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यू हे २५ ते १०० टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सेमी फायनलमध्ये दमदार शतकी खेळी करणाऱ्या जेमिमाह रॉड्रिग्ज, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, दिप्ती शर्मा, शफाली वर्मा आणि इतर खेळाडूंच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फॉलोअर्सची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्या दुप्पट तिप्पट होत आहे.
त्याचबरोबर संघातील खेळाडूंना अनेक ब्रँड्सनी त्यांचे प्रमोशन करण्यासाठी विचारणा सुरू केली आहे. या खेळाडूंच्या मॅनेजमेंट एजन्सींकडे जाहिरात करण्याची मागणी अभुतपूर्वरित्या वाढत आहे. अनेक ब्रँड्स तर खेळाडूंसोबत रिनिगोशिएशन करत आहेत. त्यांनी २५ ते ३० टक्के फी वाढवली आहे असं बेसलाईन व्हेंचर्सचे संचालक तुहीन मिश्रा यांनी सांगितलं.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सेमी फायनल सामन्यात १२७ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या जेमिमाहची ब्रँड व्हॅल्यू तर १०० टक्क्यानं वाढली आहे. जेएसडब्लू स्पोर्ट्सचे सीसीओ करन यादव हे जेमिमाहचं ब्रँड मॅनेजमेंट करतात. त्यांनी सांगितलं की, 'ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानंतर जेमिमाहला जाहिरात करण्याबाबतच्या विनंत्यांचा पाऊस पडत आहे. आम्ही सध्या १० ते १२ विविध क्षेत्रातील ब्रँड्ससोबत चर्चा करत आहोत.'
मिळालेल्या माहितीनुसार जेमिमाहच्या ब्रँड एन्डॉसमेंटची रेंज ही ७५ लाख ते १.५ कोटी इतकी असणार आहे. हे दर ब्रँडसोबत किती काळ असोसिएशन असणार आहे यावर ठरणार आहे. दुसरीकडं स्मृती मानधना ही देशातील सर्वात जास्त फी आकारणारी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिच्याकडे सध्या १६ ब्रँड्स आहेत. ती एका ब्रँडच्या प्रमोशनसाठी जवळपास १.५ कोटी ते २ कोटी रूपये आकारते.