स्पोर्ट्स

Bumrah ICC Rankings : बुमराहचे दुखापतीनंतर दिमाखदार पुनरागमन! आयसीसी क्रमवारीत ७ स्थानांची भरारी, टॉप-१० मध्ये धडक

ICC Rankings IND vs AFG T20 Series : चक्रवर्ती टॉप-५ मध्ये, पण दुखापतीमुळे आशियाई स्पर्धेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह

रणजित गायकवाड

दुबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांत बुमराहने अत्यंत प्रभावी मारा केला. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहिलेल्या बुमराहसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.

पुनरागमनानंतर खेळलेल्या दोन सामन्यांत त्याच्या खात्यात दोन बळींची नोंद असली, तरी त्याचा अचूक टप्पा, गती आणि लयबद्ध गोलंदाजी यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांना निष्प्रभ करण्यात तो यशस्वी ठरला. या प्रभावी कामगिरीचा थेट फायदा त्याला आयसीसीच्या ताज्या गोलंदाजी क्रमवारीत झाला असून, त्याने तब्बल ७ स्थानांची झेप घेत पुन्हा एकदा जगातील अव्वल १० गोलंदाजांच्या यादीत मानाचे स्थान मिळवले आहे.

दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्याने बुमराहच्या क्रमवारीत घसरण झाली होती; मात्र ताज्या कामगिरीमुळे त्याने क्रमवारीत झपाट्याने सुधारणा केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० गोलंदाजी क्रमवारीत बुमराह ६५० रेटिंग गुणांसह थेट १० व्या स्थानावर पोहोचला आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या क्रमवारीत आणखी सुधारणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यानेही क्रमवारीत मोठी मजल मारली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन लढतींमध्ये त्याने ५ फलंदाजांना बाद करत अफलातून कामगिरी नोंदवली. या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर अर्शदीपने क्रमवारीत ११ स्थानांची मोठी झेप घेत ६४२ रेटिंग गुणांसह १४ वे स्थान पटकावले आहे.

याशिवाय फिरकीपटू वरुण चक्रवर्तीनेही दोन स्थानांची सुधारणा करत ६७८ रेटिंग गुणांसह ५ व्या स्थानावर मजल मारली आहे. मात्र, पहिल्या टी-२० सामन्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे त्याला उर्वरित मालिकेतून आणि पर्यायाने आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे आगामी काळात त्याच्या क्रमवारीत घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT