स्पोर्ट्स

Bumrah Record : न खेळताही 2026च्या सुरुवातीलाच बुमराहचा ऐतिहासिक पराक्रम..! कसोटी क्रमवारीत रचला इतिहास

सलग २४ महिने ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय वेगवान गोलंदाज

रणजित गायकवाड

Bumrah Creates History Without Playing at the Start of 2026 test rankings

भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने २०२५ सालाचा शेवट एका दैदीप्यमान विक्रमाने केला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये असे शिखर गाठले आहे, जिथपर्यंत आतापर्यंत एकाही भारतीय वेगवान गोलंदाजाला पोहोचता आले नव्हते. वैयक्तिक आणि सांघिक कामगिरीच्या दृष्टीने २०२५ हे वर्ष संमिश्र राहिले असले, तरी आयसीसी (ICC) कसोटी क्रमवारीत बुमराहने इतिहास रचला आहे.

सलग २ वर्षे जागतिक क्रमवारीत अव्वल

आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीनुसार, जसप्रीत बुमराहने २०२५ सालाचा समारोप जगातील 'नंबर-१' गोलंदाज म्हणून करत आपला दबदबा कायम राखला आहे. सलग दोन वर्षे कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी राहून वर्षाचा शेवट करणारा तो भारताचा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआधी २०२४ मध्येही त्याने सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अव्वल स्थान पटकावले होते.

फिरकीपटूंच्या पंक्तीत बुमराहचा मान

बुमराहपूर्वी ही अभूतपूर्व कामगिरी केवळ दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन याच्या नावावर होती. अश्विनने २०१५ आणि २०१६ मध्ये सलग दोन वर्षे कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान राखले होते (तसेच २०२३ मध्येही तो नंबर-१ होता). महान फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांनी देखील १९७३ मध्ये वर्षाचा शेवट अव्वल क्रमांकाने केला होता. मात्र, हे दोन्ही खेळाडू फिरकीपटू असल्याने, सलग दोन वर्षे जगातील सर्वोत्तम कसोटी गोलंदाज ठरण्याचा मान मिळवणारा बुमराह हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.

२०२५ मधील आकडेवारीवर नजर टाकल्यास जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीचे दर्शन घडते. त्याने या वर्षात ८ कसोटी सामन्यांच्या १४ डावांमध्ये २२.१६ च्या भेदक सरासरीने ३१ फलंदाजांना तंबूत धाडले. विशेष म्हणजे, या काळात त्याने तीन वेळा डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला.

ODI क्रमवारीत १०० गोलंदाजांमध्येही नाही

बुमराह ८७९ रेटिंग गुणांसह कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असला, तरी एकदिवसीय (ODI) क्रमवारीत तो पहिल्या १०० गोलंदाजांमध्येही नाही. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या दोन वर्षांत बुमराहने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. त्याने आपला शेवटचा एकदिवसीय सामना १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबाद येथे विश्वचषक फायनलमध्ये खेळला होता. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत बुमराह सध्या १८ व्या स्थानावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT