Jasmine Lamboria gold medal World Boxing Championship 2025
नवी दिल्ली : लिव्हरपूल येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताची महिला बॉक्सर जस्मिन लॅंबोरियाने 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात तिने पोलंडची बॉक्सर ज्युलिया सेरेमेटाचा पराभव केला. भारतासाठी या स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक आहे.
पहिल्या फेरीमध्ये जस्मिन थोडीशी पिछाडीवर होती, पण दुसऱ्या फेरीत तिने जोरदार पुनरागमन करत सामना आपल्या नावे केला. जस्मिनने 4-1 च्या फरकाने पोलिश बॉक्सरचा पराभव केला. 57 किलो महिला गटात जस्मिनची लढत 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकलेल्या पोलंडच्या ज्युलिया सेरेमेटासोबत होती, त्यामुळे हा सामना जस्मिनसाठी सोपा नव्हता. सुवर्णपदकाच्या पहिल्या फेरीमध्ये जस्मिन थोड्या दबावात होती, पण दुसऱ्या फेरीत तिने जोरदार पुनरागमन करत 4-1 च्या फरकाने हा सामना जिंकला.
सुवर्णपदक जिंकल्यानंतर जस्मिनने सांगितले की, "मी या भावना व्यक्त करू शकत नाही. वर्ल्ड चॅम्पियन बनून मी खूप आनंदी आहे. पॅरिस 2024 मध्ये लवकर बाहेर पडल्यानंतर मी माझ्या तंत्रावर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप मेहनत घेतली. हे एका वर्षाच्या अथक परिश्रमाचे फळ आहे." पॅरिस ऑलिंपिकमध्ये जस्मिन लॅंबोरियाची कामगिरी निराशाजनक ठरली होती आणि ती स्पर्धेतून बाहेर पडली होती.
याच स्पर्धेत, पूजा राणीला महिलांच्या 80 किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तर नुपूरने 80 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे.