Jammu Kashmir Win Ranji Trophy 2026: आज हुबळी इथं झालेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जम्मू काश्मीरने बलाढ्य कर्नाटकचा पराभव करत इतिहास रचला. त्यांनी आपली पहिली वहिली रणजी ट्रॉफी जिंकली. आपल्या संघाचा हा ऐतिहासिक विजय जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मैदानावर उपस्थित राहून आपल्या डोळ्याने पाहिला.
या विजयानंतर ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीर संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले आणि खेळाडूंसाठी राज्य सरकारकडून रोख रक्कमेचं बक्षीस देखील जाहीर केलं. हे बक्षीस खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी जाहीर करण्यात आलं आहे. ओमर अब्दुल्ला यांनी संघासाठी २ कोटी रूपयांचे रोख बक्षीस जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विट केलं की, 'आणि ज्यावेळी आपल्या मुलांनी रणजी ट्रॉफी उंचावली, आपले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांना २ कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे. याचबरोबर खेळाडू हे नुकतेच तयार करण्यात आलेल्या खेळाडूंसाठीच्या नियमानुसार सरकारी नोकरीसाठी देखील पात्र असणार आहेत.'
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पहिल्यांदाच फायलनमध्ये पोहचलेल्या जम्मू काश्मीरने पाचही दिवस चांगली कामगिरी केली. कर्नाटकला पहिल्या डावात २९३ धावांवर बाद करत जम्मू काश्मीरने आपल्या पहिल्या डावात ५८४ धावा केल्या. पहिल्या डावात २९१ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात देखील जम्मू काश्मीरने ४ बाद ३४२ धावा केल्या. अखेर सामन्याचा निकाल पहिल्या डावाच्या आघाडीवर देण्यात आला. जम्मू काश्मीरनं इतिहास रचला.