Iran executes wrestler Saleh Mohammadi
नवी दिल्ली: इराणमधील खेळाडूंवर सुरू असलेल्या दमनकारी कारवाईने संपूर्ण क्रीडा जगत हादरले आहे. आंतरराष्ट्रीय पदक विजेता १९ वर्षीय कुस्तीपटू सालेह मोहम्मदी याला इराण सरकारने फाशी दिल्याने जागतिक स्तरावर संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे आता इराणच्या तुरुंगात असलेल्या इतर खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
सालेह मोहम्मदी याच्यावर दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येचा आरोप होता. मात्र, मोहम्मदीने सुरुवातीपासूनच हे आरोप फेटाळून लावले होते. "माझा कबुलीजबाब छळ करून आणि अतोनात यातना देऊन घेण्यात आला आहे," असा दावा त्याने न्यायालयात केला होता. विशेष म्हणजे, या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षींकडेही प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केला आहे. ही घटना २०१८ मधील नवीद अफकारी या कुस्तीपटूच्या फाशीच्या प्रकरणाची पुनरावृत्ती मानली जात आहे.
इराणच्या तुरुंगात सध्या केवळ कुस्तीपटूच नव्हे, तर विविध खेळांतील नामांकित खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच बंदिस्त आहेत. यात प्रामुख्याने फुटबॉल: मोहम्मद हुसेन हुसेनी आणि आमीर रझा नस्र आझादानी, बॉक्सिंग: आशियाई युवा कांस्यपदक विजेता मोहम्मद महशारी आणि मोहम्मद जवाद वफाए सानी. इतर: मॅरेथॉन धावपटू निलोफर पास, बास्केटबॉल प्रशिक्षक पयाम वाहिदी आणि वॉटर पोलो गोलकीपर अली पिशेवरजादेह, यांचा समावेश आहे.
इराणमधील या अत्याचाराविरोधात देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरील सुमारे २०० हून अधिक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला पत्र लिहिले आहे. इराणमधील क्रीडा संघटना या तिथल्या सुरक्षा यंत्रणांच्या हातातील बाहुली बनल्या असून त्या खेळाडूंच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहेत, असा ठपका या पत्रात ठेवण्यात आला आहे. सालेह मोहम्मदीच्या फाशीनंतर, आता इतर खेळाडूंचीही सुनावणी न घेता त्यांना अशीच शिक्षा दिली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.