मुंबई: यंदाही आयपीएलचा उत्साह केवळ स्टेडियमपुरता मर्यादित न राहता देशभरातील आणखी 15 शहरांमध्ये फॅन पार्कच्या माध्यमातून विस्तारला जाणार आहे. बीसीसीआयने पहिल्या टप्प्यातील ’आयपीएल फॅन पार्क्स’चे वेळापत्रक जाहीर केले असून, यात महाराष्ट्रातील नागपूर आणि रत्नागिरी या दोन शहरांची निवड करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात देशातील 15 शहरांमध्ये हे फॅन पार्क आयोजित केले जातील. नागपूरमध्ये पहिल्याच आठवड्यात म्हणजेच 28 व 29 मार्च रोजी ’मेकोसाबाग मेथडिस्ट हायस्कूल’च्या मैदानावर हा सोहळा रंगणार आहे. तर रत्नागिरीत तिसऱ्या आठवड्यात, 11 आणि 12 एप्रिल रोजी ’स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल’ येथे चाहत्यांना आयपीएलच्या सामन्यांचा थेट आनंद घेता येईल.
या फॅन पार्क्समध्ये मोठ्या पडद्यावर सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. केवळ क्रिकेटच नव्हे, तर मनोरंजन, फूड कोर्ट, लहान मुलांसाठी प्ले-झोन, व्हर्च्युअल बॅटिंग आणि 360 डिग्री फोटो बूथ अशी खास आकर्षणे येथे असतील. पुढील टप्प्यातील शहरांची घोषणा लवकरच केली जाईल, असेही बीसीसीआयने यावेळी स्पष्ट केले.
पहिला आठवडा (28-29 मार्च) : नागपूर (महाराष्ट्र), रोहतक (हरियाणा), भोपाळ (मध्य प्रदेश), तुमकुरू (कर्नाटक), कृष्णानगर (पश्चिम बंगाल).
दुसरा आठवडा (4-5 एप्रिल): मथुरा (उत्तर प्रदेश), जोधपूर (राजस्थान), निजामाबाद (तेलंगणा), म्हैसूर (कर्नाटक), भुवनेश्वर (ओडिशा).
तिसरा आठवडा (11-12 एप्रिल): रत्नागिरी (महाराष्ट्र), मेरठ (उत्तर प्रदेश), नडियाद (गुजरात), कोईम्बतूर (तमिळनाडू), राऊरकेला (ओडिशा).