IPL cricketer Shashank Singh  File Photo
स्पोर्ट्स

IPL cricketer FIR: जेवणाची चव बिघडली म्हणून IPL क्रिकेटर अन् IPS वडिलांकडून आचाऱ्याला बेदम मारहाण

जेवणाची चव बिघडल्याच्या कारणावरून इंडियन प्रीमियर लीग मधील क्रिकेटर शशांक सिंग आणि त्याचे वडील माजी आयपीएस अधिकारी शैलेश सिंग यांनी आपल्या घरच्या आचाऱ्याला (कुक) बेदम मारहाण केली.

पुढारी वृत्तसेवा

IPL cricketer Shashank Singh

भोपाळ: जेवणाची चव बिघडल्याच्या कारणावरून इंडियन प्रीमियर लीग मधील क्रिकेटर शशांक सिंग आणि त्याचे वडील माजी आयपीएस अधिकारी शैलेश सिंग यांनी आपल्या घरच्या आचाऱ्याला (कुक) बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भोपाळ पोलिसांनी पिता-पुत्रासह त्यांच्या ड्रायव्हरवर मारहाण, शिवीगाळ आणि बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याप्रकारणी गुन्हा दाखल केला आहे. भोपाळमधील रातीबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेंदोरी गावात ही घटना घडली.

मूळचा रीवा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ३१ वर्षीय विपेंद्र सिंग तोमर या आचाऱ्याने याप्रकरणी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. विपेंद्रने दिलेल्या तक्रारीनुसार, एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत त्याला दरमहा १५ हजार रुपये पगार, राहण्याची-खाण्याची सोय आणि भविष्यात सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून या माजी पोलीस अधिकाऱ्याच्या बंगल्यावर कामासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, कामावर रुजू झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच जेवणाच्या दर्जावरून त्याच्यावर मानसिक दबाव आणण्यास सुरुवात झाली आणि त्याला अश्लील शिवीगाळ करण्यात आली.

खोलीत स्वतःला कोंडून वाचवला जीव

घरचे अत्यंत खराब वातावरण आणि शिवीगाळ पाहून विपेंद्रने नोकरी सोडण्याची आणि परत रीवाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. यावर आरोपी पिता-पुत्र कमालीचे भडकले. विपेंद्रने कोणाशीही संपर्क साधू नये म्हणून त्याचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आला आणि त्याच्यावर काम करण्यासाठी सक्ती करण्यात आली.

या छळापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी विपेंद्रने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. मात्र, माजी आयपीएस अधिकारी, त्यांचा क्रिकेटर मुलगा आणि ड्रायव्हरने खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि विपेंद्रला बेदम मारहाण केली. पोलिसांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत विपेंद्रच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमांचे निशाण आढळले आहेत. आचाऱ्याची लेखी तक्रार आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे रातीबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT