Mohammed Shami IPL 2027: आयपीएल २०२७ चा मिनी लिलाव डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी संघांना आपल्या खेळाडूंची रिटेंशन लिस्ट देण्याची आजची शेवटची तारीख होती. याचवेळी कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूबाबत कोणत्या संघाशी ट्रेड केले याची देखील माहिती समोर आली. लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सच्या सॅम करनला आपल्या संघात घेण्यासाठी दोन खेळाडूंचा ट्रेड केला आहे.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि एम सिद्धार्थ आता लखनौ सुपर जायंट्सकडून नाही तर राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहेत. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात ट्रेड झाला असून मोहम्मद शमी आणि डावखुरा फिरकी गोलंदाज एम सिद्धार्थ आता राजस्थान संघाकडून खेळणार आहेत. तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन आता लखनौवासी होणार आहे. या अष्टपैलू खेळाडूसाठी लखनौने आपले दोन खेळाडू राजस्थानला दिले आहेत.
दोन्ही फ्रेंचायजींनी सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट करून ही माहिती दिली आहे. लखनौने दोन कोटी रूपयांच्या सॅम करनसाठी आपला ८ कोटीचा मोहम्मद शमी आणि ७५ लाखाचा सिद्धार्थ यांना राजस्थानला दिलं आहे.
त्यामुळं राजस्थानसाठी हा ट्रेड फायदे का सौदा ठरण्याची शक्यता आहे. जरी शमी अष्टपैलू नसला तरी त्यांना दोन वेगवेगळ्या धाटणीचे गोलंदाज मिळाले असून शमी हा मॅच विनर खेळाडू असल्यामुळं राजस्थानसाठी हा उत्साहवर्धक ट्रेड ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सॅम करनचे आयपीएल खेळणे हे इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या एनओसीवर अवलंबून असेल.
आयपीएलच्या रिटेंशन डेदरम्यानच चेन्नई सुपर किंग्जने एक मोठी घोषणा केली. त्यांनी चेन्नईचा थला अर्थात एम एस धोनी आता खेळाडू म्हणून संघासोबत असणार नाही तर तो आता संघाचा मेंटॉर म्हणून सोबत असेल असं जाहीर केलं. यामुळे आता इथून पुढे धोनी पिवळ्या जर्सीत मैदानात बॅट घेऊन येताना क्रिकेट चाहत्यांना दिसणार नाही.