IPL 2026 Yuzvendra Chahal controversy
एकीकडे आयपीएलमधील (IPL 2026) सामन्यांमधील चुरस वाढत असताना पंजाब किंग्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये चहल विमानातील प्रवासादरम्यान कथितपणे 'वेपिंग' (ई-सिगारेट ओढताना) करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये चहल त्याचा सहकारी शशांक सिंगसोबत बसलेला असून तो आपले कृत्य लपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अर्शदीप सिंगने शेअर केलेल्या पॉडकास्ट व्हिडिओमधून ही क्लिप घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र, या व्हिडिओची सत्यता आणि चहल खरोखरच ई-सिगारेट वापरत होता का, याची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
या घटनेवर भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, आरोप खरे ठरल्यास कठोर शिक्षेची मागणी केली आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टला उत्तर देताना शिवरामकृष्णन यांनी निदर्शनास आणून दिले की, भारतात 'वेपिंग' उत्पादनांवर बंदी आहे. त्यांनी सध्याच्या दंडात्मक कारवाईच्या परिणामकारकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले."भारतात वेप (Vape) प्रतिबंधित आहे. त्याला तुरुंगात टाकायला हवे. कायदे असूनही त्यांची अंमलबजावणी होत नसेल तर काय उपयोग? २५ टक्के मॅच फी म्हणजे खूपच कमी दंड आहे. जर हीच गोष्ट एखाद्या सामान्य माणसाने केली असती, तर त्याच्यावर काय कारवाई झाली असती?" असे त्यांनी 'X' पोस्टमध्ये नमूद केले आहे.
शिवरामकृष्णन यांनी आपल्या प्रतिक्रियेत रियान परागला मिळालेल्या शिक्षेचाही संदर्भ दिला. या स्पर्धेच्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये वेपिंग करताना आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला होता.
हा वाद अशा वेळी समोर आला आहे जेव्हा BCCI ने नुकतेच सर्व आयपीएल फ्रँचायझींना आचारसंहितेबाबत सविस्तर निर्देश दिले आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी संघांना आठवण करून दिली की, भारतीय कायद्यानुसार वेप्स आणि इलेक्ट्रॉनिक सिगारेटवर बंदी आहे. आयपीएलची मैदाने, टीम हॉटेल्स, ड्रेसिंग रूम आणि सराव ठिकाणांवर यांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. सैकिया यांनी अधिकृत पत्रात नमूद केले आहे की, "ड्रेसिंग रूम आणि स्पर्धेच्या इतर प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वेपिंगच्या घटना घडल्याचे बीसीसीआयच्या निदर्शनास आले आहे. त्यानुसार, ड्रेसिंग रूम, डगआउट्स, टीम हॉटेल्स आणि सराव सुविधांसह सर्व आयपीएल ठिकाणांवर वेप्स, ई-सिगारेट आणि सर्व प्रतिबंधित पदार्थांचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी आहे."