स्पोर्ट्स

RCB Controversy | बलात्काराचा आरोप असलेला यश दयाल 'आरसीबी'कडून खेळणार नाही : फ्रँचायझीचा खुलासा

Yash Dayal IPL 2026 | यंदाच्‍या हंगामासाठी करार कायम ठेवल्‍यानंतर आरसीबीच्‍या भूमिकेवर होते सवाल

पुढारी वृत्तसेवा

Yash Dayal IPL 2026

बंगळूरु : बलात्काराचा आरोप असलेला वेगवान गोलंदाज यश दयाल आयपीएल २०२६ च्या हंगामात आमच्‍या संघातून खेळणार नाही, असे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)ने हे स्पष्ट केले आहे. लिलावापूर्वी संघातील कायम असणार्‍या खेळाडूंना यादी जाहीर झाली होती, तेव्हा आरसीबीने दयालला कायम ठेवल्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. मात्र, सराव सत्रांमध्ये त्याची अनुपस्थिती पाहता तो संघात नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता आरसीबीने स्पष्ट केले आहे की, "वैयक्तिक कारणास्तव" तो यावर्षी खेळणार नाही.

आमच्या करारात आहे; पण यंदाच्‍या हंगामात यश आमच्यासोबत नसेल

आरसीबीचे 'डायरेक्टर ऑफ क्रिकेट' मो बोबॅट यांनी स्‍पष्‍ट केले की, यश दयाल अद्याप फ्रँचायझीसोबत कराराबद्ध असला तरी, तो आगामी हंगामात संघाचा भाग असणार नाही. माध्‍यमांशी बोलताना बोबॅट म्हणाले, "यश सध्या एका कठीण वैयक्तिक परिस्थितीतून जात आहे. तो अजूनही आमच्या करारात आहे, पण या हंगामात तो आमच्यासोबत नसेल."

मागील हंगामात यश दयालने केली होती चमकदार कामगिरी

२०२५ च्या आयपीएलमध्ये आरसीबीला विजेतेपद मिळवून देण्यात यश दयालने महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याने संपूर्ण हंगामात १३ बळी घेतले होते. मात्र, गेल्या वर्षीच्या फायनलपासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्याच्यावर सध्‍या कायदेशीर कारवाई सूरु आहे. दरम्‍यान, आरसीबीच्‍या भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पंड्या यांच्या साथीला यश दयालची डावखुरी वेगवान गोलंदाजी हा संघासाठी जमेची बाजू होती. तो करारात असल्याने आरसीबीला त्याच्या जागी दुसरा बदली खेळाडू घेता येणार नाही. आता भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, नुवान थुशारा, जेकब डफी आणि रसिक सलाम यांसारख्या खेळाडूंवर गोलंदाजीची मदार असेल.

यश दयालवर कोणते आरोप?

क्रिकेटपटू यश दयालवर जुलै २०२५ मध्‍ये उत्तर प्रदेशमधील गाझियाबादच्या इंदिरापुरम पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला होता. महिलेने आरोप केला आहे की, लग्नाचे आमिष दाखवून ५ वर्षांच्या संबंधात दयालने तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले. यानंतर जयपूरमध्‍ये 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत दुसरा गुन्‍हा दाखल झाला आहे. एका अल्पवयीन मुलीने आरोप केला आहे की, २०२३ पासून दयालने तिचे अनेकदा लैंगिक शोषण केले. २०२५ च्या आयपीएल दरम्यान एका हॉटेलमध्ये तिच्या करिअरमध्ये मदत करण्याचे आश्वासन देऊन त्याने अत्याचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने गाझियाबाद प्रकरणात त्याच्या अटकेला स्थगिती दिली होती. डिसेंबर २०२५ मध्ये जयपूरच्या पोक्सो न्यायालयाने त्याचा अगाऊ जामीन अर्ज फेटाळून लावला होता. पुराव्यांचे गांभीर्य लक्षात घेता तपास अद्याप सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT