Ravindra Jadeja Rajasthan Royals captain: IPL 2026च्या आधीच राजस्थान रॉयल्सच्या गोटात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. संघाने कर्णधार संजू सॅमसनला ट्रेड करून चेन्नई सुपर किंग्सकडे पाठवलं आणि त्याबदल्यात अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा तसेच सॅम करन यांना आपल्या संघात सामील करून घेतलं. संजू सॅमसनच्या जाण्यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सची धुरा कोण सांभाळणार?
राजस्थान रॉयल्सने अलीकडेच सोशल मीडियावर रविंद्र जडेजाचा एक फोटो शेअर केला. या फोटोखाली लिहिलेलं कॅप्शन “SOON थलापथी” यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तमिळ भाषेत थलापथी म्हणजे नेता किंवा सेनापती. या एका ओळीमुळे जडेजालाच राजस्थानचा नवा कर्णधार बनवलं जाणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, फ्रँचायझीकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
संजू सॅमसनच्या कर्णधारपदाखाली राजस्थानने 2025 ची IPL खेळली होती. त्या काळात रियान परागला उपकर्णधारपद देण्यात आलं होतं. संजू दुखापतीमुळे बाहेर असताना काही सामन्यांत रियान परागने संघाचं नेतृत्वही केलं होतं. त्यामुळे तो कर्णधारपदाचा मजबूत दावेदार मानला जात आहे. याशिवाय युवा खेळाडूंमध्ये ध्रुव जुरेल आणि यशस्वी जायसवाल यांचीही नावं चर्चेत आहेत. मात्र अनुभवाच्या बाबतीत पाहिलं, तर रविंद्र जडेजा सर्वात पुढे आहे.
रविंद्र जडेजाकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि IPL चा प्रचंड अनुभव आहे. मोठे सामने कसे जिंकायचे याचा अनुभव जडेजाकडे आहे. कर्णधार पदासाठी आवश्यक असलेला संयम, अनुभव आणि रणनीतीची समज जडेजाकडे आहे, त्यामुळे फ्रँचायझी त्याच्यावर विश्वास टाकू शकते, असं क्रिकेट वर्तुळात बोललं जात आहे.
जडेजाचा राजस्थान रॉयल्ससोबतचा संबंध जुना आहे. 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने IPLचं पहिलं विजेतेपद पटकावलं, तेव्हा जडेजा या संघाचा भाग होता. 2009 मध्येही तो राजस्थानसाठी खेळला होता. त्यानंतर 2012 पासून तो चेन्नई सुपर किंग्सकडे गेला.
IPL 2026 आधी राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावरील संकेत पाहता जडेजांचं नाव आघाडीवर असलं, तरी अंतिम निर्णयासाठी चाहत्यांना फ्रँचायझीच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे.