चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026)साठी खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर होण्यापूर्वी, चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांच्या अदलाबदलीची चर्चा सुरू आहे. सध्या ही डील अडचणीत सापडली आहे. या ट्रेडमध्ये सामील असलेला तिसरा खेळाडू सॅम कुरन अडथळा ठरला आहे.
राजस्थान रॉयल्सकडे परदेशी खेळाडूंचा स्लॉट भरलेला असल्याने, कुरनला संघात घेण्यासाठी त्यांना आधी एका खेळाडूला रिलीज करावे लागणार आहे.
दरम्यान, ११ नोव्हेंबर रोजी संजू सॅमसनने आपला ३१ वा वाढदिवस साजरा केला. संजूसाठी चेन्नई सुपर किंग्सने इन्स्टाग्रामवर शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली. जडेजा-सॅमसन ट्रेडच्या चर्चांदरम्यान चेन्नई सुपर किंग्सची ही पहिलीच पोस्ट होती.
या पोस्टमुळे जडेजा-सॅमसन ट्रेड डील निश्चित झाली असावी, असे अंदाज लावले जाऊ लागले. चेन्नई सुपर किंग्सच्या या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहता, ते या ट्रेड डीलमुळे नाराज असल्याचे स्पष्ट दिसून आले. जडेजाची चेन्नई सुपर किंग्समधून एक्झिट व्हावी, असे चाहत्यांना अजिबात वाटत नाहीये.
एका चाहत्याने तर चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाला पत्र देखील लिहिले आहे. इन्स्टाग्राम पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांचा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे.