IPL 2026 most sixes record
आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये षटकारांचा एक नवा 'महाविक्रम' रचला गेला आहे. या हंगामात फलंदाजांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स (LSG vs PBKS) सामन्यानंतर आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत तब्बल १३०५ षटकार ठोकले गेले आहेत. आयपीएलच्या एकाच हंगामात फटकाव्यात आलेल्या आतापर्यंतचे सर्वाधिक षटकार आहेत.
यापूर्वीच्या हंगामात १२९४ षटकारांसह नवा विक्रम प्रस्थापित झाला होता, मात्र आयपीएल २०२६ मध्ये हा विक्रम मोडीत निघत एक नवा इतिहास रचला गेला आहे. आयपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात १३०० षटकारांचा टप्पा पार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, अजूनही लीग स्टेजचे २ सामने आणि प्लेऑफचे ४ सामने खेळवले जाणे बाकी आहे. त्यामुळे आगामी ६ सामन्यांमध्ये षटकारांचा हा आकडा १४०० पार जाण्याची दाट शक्यता आहे.
राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) १५ वर्षांचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे. या हंगामात त्याने आतापर्यंत ५३ षटकार ठोकले आहेत. विशेष म्हणजे एकाच हंगामात कोणत्याही भारतीय फलंदाजाने लावलेले हे सर्वाधिक षटकार आहेत.
वैभव सूर्यवंशीची नजर आता ख्रिस गेलच्या मोठ्या विक्रमावर खिळली आहे. गेलने आयपीएलच्या एकाच हंगामात ५९ षटकार ठोकले होते. आज मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशी या विक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करेल.राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून प्लेऑफमध्ये प्रवेश केला, तर वैभवला गेलचा हा विक्रम मोडण्याच्या आणखी संधी मिळतील.
वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त या यादीत अभिषेक शर्मा हा दुसरा भारतीय फलंदाज आहे. सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) या स्टार फलंदाजाने आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ४३ षटकार ठोकले आहेत. हैदराबादचा संघ प्लेऑफसाठी आधीच पात्र ठरला असल्याने अभिषेक प्लेऑफमध्येही षटकारांची आतिशबाजी करण्यास उत्सुक असेल. या यादीतील टॉप-५ मध्ये या दोन भारतीयांव्यतिरिक्त रायन रिकेल्टन, मिचेल मार्श आणि कूपर कोनोली या तीन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
वैभव सूर्यवंशी - ५३ षटकार
अभिषेक शर्मा - ४३ षटकार
रायन रिकेल्टन - ३७ षटकार
मिचेल मार्श - ३६ षटकार
कूपर कोनोली - ३२ षटकार