IPL 2026 Longest Six
मुंबई : IPL 2026 मध्ये १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने संपूर्ण स्पर्धेत धुमाकूळ घातला. त्याने १६ सामन्यांत २३७.३० च्या तुफानी स्ट्राईक रेटने ७७६ धावा केल्या, ज्या १९ व्या हंगामात सर्वाधिक ठरल्या. या कामगिरीसह त्याने 'ऑरेंज कॅप'वरही कब्जा केला. राजस्थान रॉयल्स (RR) चा सलामीवीर सूर्यवंशीने एकूण ७२ षटकार ठोकले. एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा तो खेळाडू बनला आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा अभिषेक शर्मादेखील दमदार षटकारांसाठी ओळखला जातो. त्याने १५ सामन्यांत २०४.७२ च्या स्ट्राईक रेटने ५६३ धावा केल्या. या हंगामात सूर्यवंशीनंतर सर्वाधिक षटकार मारणारा तो दुसरा खेळाडू आहे. मात्र, इतके षटकार मारूनही सर्वात लांब षटकार मारणाऱ्यांच्या यादीत सूर्यवंशी आणि अभिषेकचा दबदबा पाहायला मिळाला नाही.
IPL 2026 मध्ये तीन खेळाडूंनी संयुक्तपणे सर्वात लांब षटकार मारण्याची कामगिरी केली. ती पुढीलप्रमाणे...
टिम डेव्हिड (RCB): चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनविरुद्ध १०६ मीटरचा षटकार मारला.
डेव्हिड मिलर (DC): दिल्ली कॅपिटल्सच्या या फलंदाजाने गुजरात टायटन्स (GT) चा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाविरुद्ध १०६ मीटरचा षटकार ठोकला.
तिलक वर्मा (MI): मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माने पंजाब किंग्स (PBKS) चा फिरकीपटू युझवेंद्र चहलविरुद्ध १०६ मीटर लांब षटकार मारला.
त्याचप्रमाणे, आरसीबीच्या जेकब बेथेलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १०४ मीटर आणि पंजाब किंग्सच्या कूपर कॉनोलीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १०३ मीटर लांब षटकार ठोकला.
२०२६: टिम डेव्हिड (विरुद्ध जेमी ओव्हरटन), डेव्हिड मिलर (विरुद्ध प्रसिद्ध कृष्णा) आणि तिलक वर्मा (विरुद्ध युझवेंद्र चहल) (१०६ मीटर लांब षटकार)
२०२५: रवींद्र जडेजा विरुद्ध लुंगी एनगिडी (१०९ )
२०२४: एमएस धोनी विरुद्ध यश दयाल (११० )
२०२३: फाफ डु प्लेसिस विरुद्ध रवी बिश्नोई (११५ )
२०२२: लिअम लिविंगस्टोन विरुद्ध मोहम्मद शमी (११७ )
२०२१: ऋतुराज गायकवाड विरुद्ध मुस्तफिजुर रहमान (१०८ )
२०२०: निकोलस पूरन विरुद्ध अब्दुल समद (१०६)
२०१९: एमएस धोनी विरुद्ध उमेश यादव (१११ )
२०१८: एबी डिव्हिलियर्स विरुद्ध इम्रान ताहीर (१११ )
२०१७: ट्रॅव्हिस हेड विरुद्ध उमेश यादव (१०९ )
२०१६: बेन कटिंग विरुद्ध शेन वॉटसन (११७ )
२०१५: एबी डिव्हिलियर्स विरुद्ध लसिथ मलिंगा (१०८ )
२०१४: डेव्हिड मिलर विरुद्ध हर्षल पटेल (१०२ )
२०१३: ख्रिस गेल विरुद्ध अली मुर्तझा (११९ )
२०१२: एमएस धोनी विरुद्ध जेम्स फ्रँकलिन (११२ )
२०११: ॲडम गिलख्रिस्ट विरुद्ध चार्ल्स लँगेवेल्ड (१२२ )
२०१०: रॉबिन उथप्पा विरुद्ध ड्वेन ब्राव्हो (१२० )
२००९: युवराज सिंह विरुद्ध मॉर्न मॉर्केल (११९ )
२००८: अल्बी मॉर्केल विरुद्ध प्रज्ञान ओझा (१२५ )
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव करत IPL 2026 च्या विजेतेपदावर नाव कोरले. विराट कोहलीच्या (४२ चेंडूंत नाबाद ७५ धावा) शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने १५६ धावांचे लक्ष्य १२ चेंडू राखून गाठले.मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) नंतर आपले विजेतेपद राखणारा (टायटल डिफेंड करणारा) आरसीबी हा तिसरा संघ ठरला आहे. आरसीबीने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच दबदबा राखला आणि अखेर ट्रॉफी जिंकून त्याचा शेवट केला. आरसीबीने गेल्या हंगामात १८ वर्षांनंतर आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती आणि रविवारी कोहलीने षटकार मारून संघाला सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून दिला.