IPL 2026  file photo
स्पोर्ट्स

IPL 2026 चा पहिला मोठा वाद! थर्ड अंपायरकडून चूक? RCB विरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? क्लासेनच्या विकेटचा व्हिडिओ व्हायरल

आयपीएल आणि वाद हे काही नवीन नाही. या हंगामात देखील पहिल्याच सामन्यात वादाची ठिणगी पडली.

मोहन कारंडे

IPL 2026 controversy

बंगळूरू: आयपीएल आणि वाद हे काही नवीन नाही. या हंगामात देखील पहिल्याच सामन्यात वादाची ठिणगी पडली. शनिवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात, एका 'कॅच'वरून मोठा गदारोळ झाला. सीमारेषेवरील एका वादग्रस्त झेलमुळे हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेनला तंबूत परतावे लागले, ज्यावरून आता सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.

मैदानावर काय घडलं?

हैदराबादच्या डावातील १४ व्या षटकात ही घटना घडली. रोमारियो शेफर्डच्या शॉर्ट पिच चेंडूवर क्लासेनने मिड-विकेटच्या दिशेने जोरात फटका मारला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या फिल सॉल्टने कॅच घेतला. यावेळी त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला की काय, असा संशय निर्माण झाला. थर्ड अंपायर रोहन पंडित यांनी काही मर्यादित कोनातून रिप्ले तपासले. कुशनची कोणतीही हालचाल दिसत नसल्याचे सांगत त्यांनी क्लासेनला आउट घोषित केले. मात्र, त्यानंतर लगेचच प्रक्षेपणात दाखवण्यात आलेल्या टॉप-अँगल रिप्लेमध्ये 'किंगफिशर' लोगो असलेल्या कुशनमध्ये किंचित हालचाल जाणवली. यामुळे मैदानात उपस्थित असलेला क्लासेन चांगलाच संतापलेला दिसला आणि त्याने अंपायरशी बराच वेळ वाद घातला.

"मला तर सॉल्टचा पाय सीमारेषेला स्पर्श झाल्याचे स्पष्ट दिसत होते. एवढ्या मोठ्या निर्णयाबाबत अंपायर इतक्या खात्रीने कसे काय सांगू शकतात? हा निर्णय पूर्णपणे संशयास्पद आहे."
— मायकल वॉन, इंग्लंडचा माजी कर्णधार

क्लासेनच्या या विकेटमुळे हैदराबादची लय बिघडली

ज्यावेळी हा वाद घडला, तेव्हा क्लासेन आणि प्रभारी कर्णधार इशान किशन यांची जोडी हैदराबादला विजयाच्या दिशेने नेत होती. क्लासेनच्या या विकेटमुळे हैदराबादची लय बिघडली आणि सामन्याचे पारडे बंगळूरूच्या बाजूला झुकले. आरसीबीने हा सामना जिंकला असला तरी, या वादग्रस्त निर्णयामुळे सोशल मीडियावर अंपायरच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT