IPL 2025 Final Winner Royal Challengers Bengaluru RCB IPL Instagram Account
स्पोर्ट्स

IPL 2025 RCB Win: अँडी फ्लॉवर, डीके अण्णा ते प्रभावी गोलंदाज... या पाच कारणांमुळे आरसीबीने कप जिंकला

Who Won IPL 2025: १७ वर्षांच्या जखमेवर विजयाचं मलम लावत आरसीबीने समर्थकांना सेलिब्रेशनची संधी दिलीच. 2025 च्या आयपीएल फायनलमध्ये आरसीबीची विजय झाला.

पुढारी वृत्तसेवा

How Royal Challengers Bengaluru won IPL 2025

मुंबई : 17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने मंगळवारी आयपीएलच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जवर सहा धावांनी विजय मिळवत चषकावर नाव कोरले. १७ वर्षांच्या जखमेवर विजयाचं मलम लावत आरसीबीने समर्थकांना सेलिब्रेशनची संधी दिलीच. या विजयाचं श्रेय कोणाचं, ख्रिस गेल, ए बी डिव्हिलियर्स अशा दिग्गजांचा भरणा असतानाही जे शक्य झालं नाही ते 2025 मध्ये कसं शक्य झाले हे जाणून घेऊया ‘पुढारी’ विश्लेषणातून....

1. मो बोबाट यांचा दृष्टीकोन

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये आयपीएलच्या लिलावापूर्वी आरसीबीचे संचालक मो बोबाट यांनी केलेलं विधान संघाचा दृष्टीकोन अधोरेखित करते. ते म्हणाले होते, आम्ही खेळाडू कसा खेळतो यापेक्षा तो संघासाठी कसा खेळू शकतो याला प्राधान्य देतोय. खेळाडूची प्रतिष्ठा आणि नाव या पेक्षा संघाची कामगिरी महत्त्वाची असे स्पष्ट संदेश त्यांनी संघाला दिला.

16 सामन्यांमध्ये नऊ खेळाडूंना सामनावीर हा पुरस्कार मिळाला. यातच आरसीबीचा संघ हा सर्वोत्तम का ठरला हे स्पष्ट होते. क्रुणाल पंड्या, टीम डॅव्हीड, जोश हॅजलवूड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, सुयश शर्मा ही यादी वाचली की नवीन खेळाडूही चमत्कार घडवू शकतात हे सिद्ध होते.

2. अँडी फ्लॉवर आणि दिनेश कार्तिक

आरसीबीच्या संचालकांनी त्यांचा हेतू काय हे स्पष्ट केल्यानंतर पुढची जबाबदारी होती ती हेड कोच अँडी फ्लोवर, बँटिंग मेंटॉर दिनेश कार्तिक यांची. झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवरने भारताविरुद्ध धावांचा पाऊस पाडत भारतीयांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. पण हाच अँडी फ्लॉवरमुळे आरसीबी समर्थकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणण्यासाठी कारणीभूत ठरला.

उदाहरण द्यायचं झालं तर यंदा संघाचा कर्णधार होता रजत पाटीदार. रजत पाटीदार हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला क्रिकेटपटू नसला तरी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने मध्य प्रदेशला अंतिम सामन्यापर्यंत नेले. इतकंच नव्हे तर तो मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. फ्लॉवर आणि कार्तिकने मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याशीही चर्चा केली आणि शेवटी कर्णधारपदी रजतच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

निर्णय घेण्याची क्षमता आणि नेतृत्वगूण या दोन कारणांसाठी रजत पाटीदारला संघाचे कर्णधारपद देण्यात आले. निर्णय घेण्यापूर्वी फ्लॉवर आणि कार्तिकने विराट कोहलीला विश्वासात घेतले. कोहलीनेही रजत पाटीदारला पाठिंबा दर्शवला.  

फिल सॉल्टला तर आरसीबीने तब्बल 11. 25 कोटी रुपयांमध्ये संघात घेतलं. सॉल्टमध्ये चांगलं षटक हे मोठ्या षटकात बदलण्याची क्षमता आहे असं दिनेश कार्तिकने एका मुलाखतीत सांगितलं होतं. याचा पुरावा म्हणजे मिशेल स्टार्कसारख्या दादा गोलंदाजाविरुद्ध सॉल्टने एकाच षटकात तब्बल 30 धावा चोपल्या.  

पाटीदारला दुखापत झाल्यानंतर जितेश शर्माने दोन हाय प्रेशर सामन्यांमध्ये आरसीबीचे नेतृत्व केले. दोन्ही सामन्यात जितेशने चांगली कामगिरी केली. पण पडद्यामागच्या घडामोडी पाहिल्या तर याची सुरूवात झाली होती ती जानेवारी- फेब्रुवारीत. कार्तिक आणि फ्लॉवरच्या प्रशिक्षण शिबीरांमध्ये जितेश घाम गाळत होता. जे फटके मारणं शक्य नव्हतं त्यावर जितेशने मेहनत घेतली.  डीके अण्णाला (दिनेश कार्तिक) वाटतं की 360 डिग्रीमध्ये फटकेबाजी करू शकतो आणि आज मी जे फटके मारतो ते कार्तिक यांनीच शिकवले असं जितेशने एका मुलाखतीत सांगितलं होतं.  Stardom पेक्षा संघाचं स्ट्रक्चर महत्त्वाचं यावर फ्लॉवर आणि कार्तिकनं काम केलं.

3.  रजत पाटीदार...बस नाम याद रखना

रजत पाटीदार हा आरसीबीचा कर्णधार झाल्यानंतर सर्वांच्याच भूवया उंचावल्या. पण रजतने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यान ‘नाण खणखणीत’ असल्याचं दाखवून दिले. ईडन गार्डन्सवर आरसीबीने केकेआरला 2019 नंतर पहिल्यांदाच धूळ चारली. चेन्नईच्या खेळपट्टीवर अर्धशतक ठोकून 2008 नंतर पहिल्यांदाच सीएसकेला त्यांच्या घरच्या मैदानावर नमवले. 2015 नंतर पहिल्यांदा आरसीबीने मुंबईला त्यांच्या होम ग्राऊंडवर लोळवले. ही झाली आकडेवारीची 'पाटी'.

रजतच्या नेतृत्वगुणाची झलक दिसली ती केकेआरविरुद्ध. पाटीदारने सुयश शर्माला अँड्रूय रसेलविरुध्द गोलंदाजीची संधी दिली. १८ चेंडूत ३४ धावांचे माफक आव्हान असताना सुयशने दमदार गोलंदांजी केली आणि १८ व्या षटकात फक्त सहाच धावा दिल्या. यानंतर रजतने संपूर्ण सामन्यात फलंदाजांनी ज्याला अक्षरश: धुतलं होतं त्याच यश दयालला शेवटचं षटक दिलं आणि त्याची ही खेळी यशस्वी ठरली. रजत पाटीदारबाबत सर्वोत्तम बाब एकच आहे ती म्हणजे तो मैदानात शांत असतो... आरसीबीचा वेगवान गोलंदान भुवनेश्वर कुमारने दिलेली ही प्रतिक्रिया रजत सर्वोत्तम कर्णधार का ठरला हे दाखवून देते. टी - 20 सामन्यात एका क्षणात सामना फिरतो आणि अशा वेळी कर्णधार हा शांत असणं गरजेचं आहे. घरच्या मैदानावर दोन सामने गमावल्यावरही रजत ड्रेसिंग रुममध्ये शांतच होता, असं आरसीबीचे खेळाडूच मुलाखतीत सांगत होते.

4. गोलंदाजी

आरसीबीसाठी नेहमीची डोकेदुखी म्हणजे गोलंदाजी. यंदाचा सीझन हा अपवाद ठरला. जॉश हॅझलवूड, भुवनेश्वर कुमार आणि दयाल या तीन वेगवान गोलंदाजांनी समर्थपणे भार सांभाळला. पण मॅच विनर ठरले ते क्रुणाल पंड्या आणि सुयश. फिरकी गोलंदाजी ही आरसीबीची कमकुवत बाजू असायची. मात्र यंदा या दोन्ही फिरकीपटूंनी संघाला सामने जिंकवून दिले. हॅझलवूडने 12 सामन्यात 22 विकेट मिळवून दिल्या. तर क्रुणाल पंड्याने 15 सामन्यात 17 विकेट, भुवनेश्वर कुमारने 14 सामन्यात 17 विकेट मिळवत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. अंतिम सामन्यातही क्रुणाल पंड्याच सामनावीर ठरला.

5. विराट कोहली… No. 18

आरसीबी म्हणजे विराट कोहली हे गेल्या कित्येक वर्षांचं समीकरण. 18 नंबरची जर्सी घातलेला विराट मैदानात उतरला की चाहते अक्षरश: मैदानच डोक्यावर घेतात. कोहलीनेही त्याच्या चाहत्यांना कधीच निराश केलं नाही. यंदाच्या पर्वातही विराटने 15 सामन्यांमध्ये 54.75 च्या सरासरीने तब्बल 657 धावा चोपल्या. यात तब्बल आठ अर्धशतकांचा समावेश असून विराटचा स्ट्राईक रेट हा 144 इतका होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT