नवी दिल्ली : भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने माजी क्रिकेटपटू, समालोचक संजय मांजरेकर यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देताना त्यांना सुनावले आहे. मांजरेकर यांनी यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघावर टीका करताना विराट कोहली विरुद्ध जसप्रीत बुमराह यांच्यातील जुगलबंदी आता सर्वश्रेष्ठ विरुद्ध सर्वश्रेष्ठ अशी राहिलेली नाही, असे म्हटले होते. त्यावर विराटच्या भावाने त्यांच्यावर पलटवार केला.
विराट यंदा आयपीएल स्पर्धेत खेळत असला तरी त्याचा स्ट्राईक रेट फारसा लक्षवेधी नाही, असे मांजरेकर यांनी म्हटले होते. त्यांनी जाहीर केलेल्या त्यांच्या आयपीएल टॉप टेनमध्ये विराटला स्थानदेखील दिले नव्हते. ही यादी तयार करताना त्यांनी स्ट्राईक रेटला महत्त्व दिल्याचे म्हटले होते.
विशेष म्हणजे विराट यंदा आयपीएल स्पर्धेत उत्तम बहरात आहे. मात्र, त्याचा स्ट्राईक रेट चर्चेचा विषय ठरला आहे. याला प्रत्युत्तर देताना विकास कोहलीने संजय मांजरेकर यांच्या स्ट्राईक रेटचा थेट उल्लेख केला. त्याने आपल्या पोस्टमध्ये ‘संजय मांजरेकर, वन डे कारकिर्दीतील स्ट्राईक रेट 64.31.200 च्या स्ट्राईक रेटबद्दल फक्त बोलणे सोपे आहे,’ असे नमूद केले आहे.
दरम्यान, विराटने आयपीएल 2025 मध्ये 10 सामन्यांत 63.28 च्या सरासरीने 443 धावा केल्या असून यात 6 अर्धशतकांचा समावेश आहे. यातील काही डाव खूपच संथ असल्याची टीका झाली होती. पण, सामन्यानंतर विराटने आपल्या खेळीचे समर्थन केले होते. त्यावेळी तो म्हणाला होता, मी सामन्यात आवश्यकतेप्रमाणे खेळातील द़ृष्टिकोन ठरवतो. काही वेळा एकेरी-दुहेरी धावांवर भर द्यावा लागतो. बरेचदा खेळपट्टीचे स्वरूप कसे आहे, यावरदेखील खूप काही ठरते.’