पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२५ (IPL 2025) मधील ३४ वा सामना खूपच चुरशीचा झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे झालेल्या १४ षटकांच्या लो स्कोअरिंग आयपीएलच्या साखळी सामन्यात पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला (RCB vs PBKS) घरच्या मैदानावर चारीमुंड्या चीत केले. पंजाबने आरसीबीवर पाच विकेट्सनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना, टीम डेव्हिडने २६ चेंडूत ५० धावांची खेळी केली आणि आरसीबीला ९ बाद ९५ धावांपर्यंत नेले. आरसीबीकडून जोश हेझलवूडने अचूक गोलंदाजी करत १४ धावा देत ३ बळी घेतले. पण त्याची ही कामगिरी पंजाबला केवळ १२.१ षटकांत लक्ष्य गाठण्यापासून रोखू शकली नाही. पंजाबकडून नेहल वधेराने सर्वाधिक १९ चेंडूत ३३ धावा केल्या. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार (RCB captain Rajat Patidar) याने १८ चेंडूत २३ धावांची खेळी केली. यात एक षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. त्याने आयपीएलच्या इतिहासात १ हजार धावा पूर्ण केल्या. यामुळे तो दुसरा १ हजार सर्वात जलद धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला. रजतने ६२६ चेंडूत १ हजार धावा पूर्ण केल्या.
विशेष म्हणजे त्याने केवळ ३० डावांत ही कामगिरी केली. तो यादीत गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शन याच्यानंतर दुसऱ्या स्थानी आहे. ज्याने २५ डावांत अशी कामगिरी केली आहे. तसेच रजत पाटीदारने सचिन तेंडुलकर आणि ऋतुराज गायकवाड (दोघांनी ३१ डाव खेळून) आणि तिलक वर्मा (३३ डाव) यांना मागे टाकले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, पाटीदार आयपीएलच्या इतिहासात ३५ पेक्षा जास्त सरासरीने आणि १५० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने १ हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.
कालच्या पराभवानंतर, आरसीबीची सात सामन्यांत चार विजय आणि तीन पराभवांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. तर पंजाब किंग्जने १० गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पंजाबने सात सामन्यांत पाचवा विजय मिळवले आहेत.