

बंगळूर : पावसाचा व्यत्यय आलेल्या 14 षटकांच्या लो स्कोअरिंग आयपीएल साखळी सामन्यात पंजाबने आरसीबीला घरच्या मैदानावर चारीमुंड्या चीत केले. या पराभवासह बंगळूरची घरच्या मैदानावर निराशा झाली. या लढतीत आरसीबीला प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 14 षटकांत 9 बाद 95 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर पंजाबने 12.1 षटकांत 5 बाद 98 धावांसह दणकेबाज विजय मिळवला. नेहल वधेराची 19 चेंडूंत नाबाद 33 धावांची खेळी निर्णायक ठरली.
विजयासाठी 14 षटकांत 96 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना पंजाबची देखील खराबच सुरुवात झाली. प्रियांश आर्य (16) व प्रभसिमरन सिंग (13) हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्याने 3.4 षटकांत 2 बाद 32 अशा बिकट स्थितीत हा संघ होता. कर्णधार श्रेयस अय्यर (7) व जोश इंग्लिस (14) हे देखील स्वस्तात बाद झाले. मात्र, या मोक्याच्या क्षणी नेहल वधेराने 19 चेंडूत 33 धावांची बरसात करत पंजाबला एककलमी वर्चस्व प्राप्त करून दिले.
पावसाने व्यत्यय आलेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थही ठरवला. फिल सॉल्ट (4) व विराट कोहली (1) हे दोन्ही खंदे सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर तोच कित्ता मधल्या व तळाच्या फलंदाजांनी गिरवला आणि यामुळे पाहता पाहता आरसीबीचा डाव गडगडत राहिला.
मधल्या फळीत रजत पाटीदारने 18 चेंडूंत 23 धावा केल्या. मात्र, सेट होईल, असे वाटत असतानाच त्याने आपली विकेट फेकली. लिव्हिंगस्टोन (4), जितेन शर्मा (2), कृणाल पंड्याही (1) स्वस्तात बाद होत गेले. एकवेळ तर आरसीबीचा संघ 11.5 षटकात 9 बाद 63 अशा बिकट स्थितीत होता. मात्र, त्यानंतर अर्धशतकवीर टीम डेव्हिडने सर्व सूत्रे आपल्या हाती घेत 26 चेंडूंत नाबाद 50 धावांचे योगदान दिले आणि याचमुळे आरसीबीला नव्वद धावांचा टप्पा पार करता आला होता.
आरसीबी : निर्धारित 14 षटकांत 9 बाद 95. (टीम डेव्हिड 26 चेंडूंत 5 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 50, रजत पाटीदार 18 चेंडूंत 23. अर्शदीप, मार्को जान्सेन, युजवेंद्र चहल, हरप्रीत ब्रार प्रत्येकी 2 बळी. झेवियर 1-26).
पंजाब किंग्ज : 12.1 षटकांत 5 बाद 98. (नेहल वधेरा 19 चेंडूंत नाबाद 33, प्रियांश आर्य 16. हेझलवूड 3-14, भुवनेश्वर 2-26).