पुढारी ऑनलाईन डेस्क
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट (Indian Wrestler Vinesh Phogat) हिला पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) महिलांच्या ५० किलो वजनी कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. भारतीय संघाने महिला कुस्तीच्या ५० किलो गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरविल्याची माहिती दिली आहे. २९ वर्षीय फोगाट हिला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले. कारण अंतिम सामन्याच्या दिवशी तिचे वजन १५० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. भारतीय संघाने सर्वोत्तम प्रयत्न करूनही आज सकाळी फोगाट यांचे वजन ५० किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. (Vinesh Phogat Disqualified)
मंगळवारी रात्री विनेश फोगट यांच्या टीमने सर्वोत्तम प्रयत्न करूनही बुधवारी तिचे वजन कमी झाले नाही. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास रचला. महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत फोगाटने क्युबाच्या गुझमन लोपेझचा ५-० ने पराभव केला. यासह तिने आपले भारतासाठी ऑलिम्पिक पदक निश्चित केले होते. साक्षी मलिकनंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला कुस्तीपटू ठरणार होती. (paris olympics 2024 indian wrestler vinesh phogat) पण आता ओव्हरवेटमुळे तिला अंतिम सामन्यात खेळात येणार नाही.
"भारतीय संघाने खेद व्यक्त करत महिला कुस्तीच्या ५० किलो गटातून विनेश फोगाटच्या अपात्रतेची बातमी शेअर केली आहे. संघाने रात्रभर सर्वोतोपरी प्रयत्न करूनही आज सकाळी तिचे वजन ५० किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त राहिले. यावर कोणतीही टिप्पणी केली जाणार नाही. अशा परिस्थितीत भारतीय ऑलिम्पिक संघटना तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करते,” असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे.
याआधी उपांत्यपूर्व फेरीत फोगाटचा सामना युक्रेनच्या ओक्साना लिवाचशी झाला होता. भारतीय कुस्तीपटूने पहिल्या फेरीत २ गुण मिळवत चांगली सुरुवात केली. दुसरीकडे, ओक्सानाने जोरदार प्रयत्न केले पण अनुभवी फोगटविरुद्ध गुण मिळवता आले नाहीत. दुसऱ्या फेरीत, खडतर स्पर्धेदरम्यान, दोन्ही खेळाडूंनी ५-५ गुण मिळवले आणि अखेरीस फोगाटने सामना ७-५ असा जिंकला.