पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा गोल्डन बॉय आणि स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा नवा इतिहास घडविण्यास सज्ज झाला आहे. आज (दि.६) नीरज चोप्राने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. त्याने तीनपैकी पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर लांब थ्रो करून पात्रता फेरी आरामात गाठली. आता गुरुवार, ८ ऑगस्टला होणार्या अंतिम फेरीकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावल्यास ऑलिम्पिकच्या इतिहासातील जेतेपद राखणारा तो जगातील पाचवा भालाफेकपटू ठरेल. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक गटात दोन सुवर्णपदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.
या वर्षी धीरज चोप्रा याने केवळ तीन स्पर्धांमध्ये भाग घेतला, परंतु त्याच्या इतर स्पर्धकांनीही चांगली कामगिरी केली नाही. चोप्राने मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये 88.36 मीटर भाला फेकला, तर ॲडक्टरमधील अस्वस्थतेमुळे त्याने खबरदारी म्हणून 28 मे रोजी ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइकमध्ये भाग घेतला नाही. मात्र जूनमध्ये फिनलंडमधील पावो नूरमी गेम्समध्ये ८५.९७ मीटर भाला फेकून त्याने सुवर्णपदक पटकावले होते. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये टोकियो ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता झेक प्रजासत्ताकचा जेकब वालॅच, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि ग्रेनेडाचा माजी विश्वविजेता अँडरसन पीटर्स यांचे आव्हान असणार आहे.
यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकुण ३२ भालाफेकपटू पात्र ठरले आहेत. त्यांचे प्रत्येकी १६ अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. 32 मधील 12 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. पात्रता मानक 84 मीटरवर सेट केले आहे, याचा अर्थ ८४ मीटर भाला फेकणारा खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.मात्र ८४ मीटर अंतर भाला फेकण्यास खेळाडू पात्र ठरले नाही तर अंतरानुसार 12 सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे अंतिम फेरीत प्रवेश करणार आहेत.