Manish Sharma Slaps Rahim Pardesi: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटला की प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. आता हीच रंगत बॉक्सिंगच्या रिंगणाबाहेरही पाहायला मिळाली. दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या बॉक्सरमध्ये सामन्यापूर्वीच जोरदार वाद झाला. भारतीय इन्फ्लुएन्सर आणि बॉक्सर मनीष शर्मा याने पाकिस्तानी प्रतिस्पर्धी रहीम पारदेसी याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मनीष शर्मा हा सोशल मीडियावर 'हाफ इंजिनिअर' (Half Engineer) या नावाने प्रसिद्ध आहे. दुबईतील 'फ्युरी बाय द सी – मुका बॉक्सिंग' (Fury by the Sea – MUKA Boxing) या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही बॉक्सर एका प्रमोशनल कार्यक्रमात आमनेसामने आले होते. शुक्रवारी दुबईतील निक्की बीच येथे त्यांच्यात सामना होणार आहे. आता या सामन्याकडे बॉक्सिंग चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे.
सामन्यापूर्वी झालेल्या या कार्यक्रमात मनीष शर्मा आणि रहीम पारदेसी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. रहीम पारदेसी हा हावभाव करून मनीषला चिथावण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे दोघांमधील वाद वाढला.
अखेर मनीष शर्माचा संयम सुटला आणि त्याने सर्वांसमोर रहीमच्या कानशिलात लगावली. हा प्रकार घडताच कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी दोघांनाही एकमेकांपासून दूर केले. या घटनेमुळे कार्यक्रमात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मनीषच्या कृतीवर आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी त्याची खिल्ली उडवली.
मनीष शर्मा हा सोशल मीडियावर 'हाफ इंजिनिअर' या नावाने ओळखला जातो. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून त्याने लोकप्रियता मिळवली. त्यानंतर त्याने बॉक्सिंगच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले. सोशल मीडियावरील त्याच्या लोकप्रियतेमुळे त्याच्या आगामी सामन्याची चर्चा सुरू आहे.
आता दुबईत होणाऱ्या मनीष शर्मा आणि रहीम पारदेसी यांच्यातील सामन्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. सामन्यापूर्वीच दोघांमध्ये झालेल्या या प्रकारामुळे प्रत्यक्ष बॉक्सिंग रिंगमध्ये कोण बाजी मारणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.