महिला एकदिवसीय विश्वचषक सप्टेंबर 2025 च्या अखेरीस भारतात खेळला जाणार आहे. स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होतील. या मेगा इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाच्या कामगिरीवर असतील. दरम्यान, या स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडिया सप्टेंबरच्या सुरुवातीला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाचा सामना करेल, ज्यामध्ये त्यांना तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत वेळापत्रक जाहीर केले आहे.
भारतीय महिला संघाची 2025 मध्ये आतापर्यंत वनडेतील कामगिरी उत्तम राहिली आहे. दरम्यान, वनडे विश्वचषकापूर्वी टीम इंडिया 14 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाईल, तर शेवटचा सामना 20 सप्टेंबर रोजी होईल.
वनडे मालिकेतील तिन्ही सामने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर डे-नाईट खेळवले जातील. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सामन्यांना सुरुवात होईल. टीम इंडिया ही मालिका वनडे विश्वचषक लक्षात घेऊन खेळणार आहे, ज्यामध्ये सर्व महत्त्वाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवले जाईल.
पहिला वनडे सामना : 14 सप्टेंबर, दुपारी 1:30 वा. एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
दुसरा वनडे सामना : 17 सप्टेंबर, दुपारी 1:30 वा. एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
तिसरा वनडे सामना : 20 सप्टेंबर, दुपारी 1:30 एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
टीम इंडियाला 28 जून ते 22 जुलै दरम्यान इंग्लंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्याची सुरुवात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. भारतीय महिला संघाने अलीकडेच श्रीलंकेत वनडे तिरंगी मालिका जिंकली.
यासोबतच, बोर्डाने जाहीर केले आहे की सप्टेंबरच्या अखेरीस भारत अ पुरुष संघ ऑस्ट्रेलिया अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघांविरुद्ध दोन बहु-फॉरमॅट मालिका खेळेल. लखनौमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही बहु-दिवसीय सामने होतील, तर कानपूरमध्ये तीन मर्यादित षटकांचे सामने खेळवले जातील.
विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिका मालिकेतील दोन बहु-दिवसीय सामने बीसीसीआयने नुकत्याच उद्घाटन केलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे होतील, जे या ठिकाणी खेळले जाणारे पहिले मोठे सामने असतील.
भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील तीन मर्यादित षटकांचे सामने बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. वरिष्ठ पुरुष दक्षिण आफ्रिका संघही 14 नोव्हेंबरपासून भारतात असेल, जिथे त्यांना दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी, अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील भारत अ संघ 2 जून आणि 9 जून रोजी अनुक्रमे कॅन्टरबरी आणि नॉर्थम्प्टन येथे इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन प्रथम श्रेणी सामने खेळेल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ संघाविरुद्धच्या इन्ट्रा स्कॉड सामन्याने या दौऱ्याचा समारोप होईल.