प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo
स्पोर्ट्स

Women's Asia Cup 2026 : भारताने महिला आशिया चषक जिंकल्यास 'ट्रॉफी चोर' नक्वीमुळे पुन्हा रंगणार 'हायव्होल्टेज ट्रॉफी ड्रामा'?

एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वींच्या हस्ते चषक स्वीकारण्यास भारतीय संघाचा नकार कायम राहण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

Women's Asia Cup 2026 trophy controversy : दुबईत सुरू असलेल्या महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. साखळी फेरीत पाकिस्तान, थायलंड आणि हाँगकाँगचा पराभव करत भारताने विजयाची हॅटट्रिक साजरी केली अन् उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय संघ यंदाच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताने विजेतेपद पटकावल्यास ट्रॉफीवरून मैदानावर मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळू शकतो.

'ट्रॉफी चोर' मोहसिन नक्वी अंतिम सामन्‍याला उपस्‍थित राहण्‍याची शक्‍यता

एशियन क्रिकेट कौन्सिलचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी अंतिम सामन्याला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नक्वी व्यासपीठावर पुरस्कार वितरणासाठी आल्यास भारतीय संघ त्यांच्या हातून चषक स्वीकारणार नाही, अशी चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे.

मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारताचा का विरोध?

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, २०२५ च्या पुरुष आशिया चषक स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्ताविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास (नो हॅन्डशेक) नकार दिला होता. हीच राष्ट्रप्रेमाची आणि विरोधाची भूमिका यंदा महिला आशिया चषक २०२६ मध्येही हरमनप्रीतच्या संघाने कायम ठेवली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात भारतीय महिला खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांशी हात मिळवणे टाळले.याच भूमिकेमुळे, जर मोहसिन नक्वी अंतिम सामन्यात चषक देण्यासाठी पुढे आले, तर भारतीय संघ त्यांच्यावर बहिष्कार टाकू शकतो.

'ट्रॉफी चोर' नक्वी आणि २०२५ चा वाद

२०२५ च्या पुरुष आशिया चषक विजेतेपदानंतर सूर्यकुमारच्या संघाने नक्वी यांच्याकडून चषक घेण्यास ठाम नकार दिला होता. तब्बल एक तास मैदानावर हा ड्रामा सुरू होता. भारतीय खेळाडू व्यासपीठावर न आल्याने चिडलेले पीसीबी आणि एसीसी प्रमुख मोहसिन नक्वी ती ट्रॉफी स्वतःसोबत घेऊन निघून गेले होते. विशेष म्हणजे, ती ट्रॉफी आजही एसीसीच्या कार्यालयात धूळ खात पडली असून भारताला ती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे नक्वींवर 'ट्रॉफी चोर' अशीही टीका झाली होती. आता महिला संघानेही तीच ठाम भूमिका घेतल्यास, भारत यंदाही विजेतेपद पटकावूनही ट्रॉफीशिवायच मायदेशी परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT