पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs Zimbabwe T20 Series : टी-20 विश्वचषक स्पर्धेची सांगता उत्साहात झाली आहे. भारतीय संघही विजेतेपद पटकावून मायदेशी परतला आहे. आता सर्वांच्या नजरा झिम्बाब्वेविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेकडे लागल्या आहेत. या मालिकेसाठी भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. युवा शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा आहे. उभय संघांमध्ये पाच टी-20 सामन्यांची मालिका होणार असून त्यातील पहिला सामना 6 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सायंकाळी 4.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. जर भारताने पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वेला हरवले तर जे नवा इतिहास रचला जाणार आहे.
सध्या, बर्म्युडा संघाच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आहे. या संघाने 2021 ते 2023 या कालावधीत सलग 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. मलेशियानेही हा पराक्रम केला आहे. या संघाने 2022 मध्ये सलग 13 सामने जिंकले. हे दोन्ही देश कसोटी सामने खेळत नाहीत. यानंतर, अफगाणिस्तान संघाने 2018 ते 2021 पर्यंत सलग 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. तर रोमानियाने 2020 ते 2021 पर्यंत सलग 12 सामने जिंकले आहेत.
भारतीय संघाने 2021 ते 2022 या कालावधीत सलग 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले होते, परंतु त्यानंतर ही विजयाची मालिका खंडित झाली. पण आता पुन्हा टीम इंडियाने सलग तितकेच सामने जिंकले आहेत. हा विजयाचा रथ 2023 पासून सुसाट धावत आहे. 2024 मध्येही त्याचा वेग कायम आहे. जर टीम इंडियाने पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात झिम्बाब्वेला पराभूत केले तर त्याच्या सलग सामन्यातील विजयांची संख्या 12 वरून 13 वर जाईल. म्हणजेच कसोटी सामने खेळणा-या देशांच्या यादीत सलग 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा भारत हा पहिला देश बनेल.
एवढेच नाही तर भारतीय संघाला सर्व विक्रम उद्ध्वस्त करण्याची संधी आहे. म्हणजेच बर्म्युडा आणि मलेशियाला मागे टाकले तर त्यांना सलग आणखी दोन सामने जिंकावे लागतील, जे अवघड काम नाही. यजमान झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना शनिवारी म्हणजेच 6 जुलै, तर दुसरा सामना 7 जुलैला खेळवला जाणार आहे. दोन्ही सामने हरारे येथे होणार आहेत. म्हणजेच दोन दिवसांत टीम इंडिया मोठा इतिहास रचणार आहे, जो मोडणे अशक्य नसेल पण अवघड नक्कीच असेल.