स्पोर्ट्स

IND vs WI Test : टीम इंडियाकडून दुसऱ्या दिवशी ४४८ धावांचा डोंगर! भारतीय फलंदाजांकडून विंडिजच्या गोलंदाजांची धूळधाण

IND vs WI Ahmedabad Test : टीम इंडियाची एकूण आघाडी आता २८६ धावांपर्यंत पोहचली

रणजित गायकवाड

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वर्चस्व राखले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात पाच गडी गमावून ४४८ धावांचा डोंगर उभा केला आहे. सध्या रवींद्र जडेजा १०४ आणि वॉशिंग्टन सुंदर ९ धावा काढून नाबाद आहेत.

शुक्रवारचा (दि. ३) दिवस भारतीय संघासाठी अत्यंत उत्कृष्ट ठरला. २ बाद १२१ धावांच्या पुढे खेळायला सुरुवात करत टीम इंडियाने सामन्याच्या दुस-या दिवसाअखेर तब्बल ३२७ धावा वसूल केल्या. मात्र यादरम्यान, शुभमन गिल, केएल राहुल आणि ध्रुव जुरेलच्या रूपात तीन महत्त्वाचे बळी गमावावे लागले.

गिलचे अर्धशतक, राहुलचे ११ वे कसोटी शतक

सामन्याच्या दुस-या दिवसाची सुरुवात शुभमन गिलने दमदार अर्धशतक झळकावत केली, मात्र तो ५० धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुलने आपली संयमी फलंदाजी सुरू ठेवत आपल्या कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतक पूर्ण केले. १२ चौकारांच्या मदतीने १०० धावा करून तो माघारी परतला.

ध्रुव जुरेलचे पहिले, जडेजाचे सहावे शतक!

राहुल बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या युवा ध्रुव जुरेलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शानदार शतक झळकावले. १५ चौकार आणि तीन उत्तुंग षटकारांच्या मदतीने त्याने १२५ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यानंतर 'सर' रवींद्र जडेजाने आपला फॉर्म कायम ठेवत कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक पूर्ण केले. जडेजा १०४ धावांवर खेळत आहे. वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या डावात केवळ १६२ धावा केल्या होत्या, त्यामुळे टीम इंडियाची एकूण आघाडी आता २८६ धावांपर्यंत पोहचली आहे. सामन्याच्या तिस-या दिवशी ही आघाडी आणखी वाढवण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT