अहमदाबाद : वादग्रस्त आशिया चषकातील विजयानंतर मिळालेल्या कमी वेळेतही, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुरुवारपासून येथे सुरू होणार्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून उतरेल. वेस्ट इंडिजचा संघ सध्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे कमकुवत आहे. त्यामुळे अस्तित्व राखण्याचे आव्हान त्यांना येथे प्रामुख्याने पेलावे लागेल. सकाळी 9.30 वाजता पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होईल.
कर्णधार गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह बहुतेक भारतीय संघ सदस्य सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री दोन टप्प्यात दुबईहून येथे दाखल झाले. उभय संघातील ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने या सामन्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या, बरीच रस्सीखेच रंगलेल्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधल्याने गिलचा संघ गुणतालिकेत तिसर्या स्थानी आहे. गुरुवारपासून सुरू होणारा सामना हा मायदेशातील चार सामन्यांपैकी पहिला असेल. यात यजमान संघ कमाल गुण मिळवण्याचा प्रयत्न करेल.
अहमदाबादमधील खेळपट्टी यावेळी हिरवीगार असून, हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. उष्ण आणि दमट हवामान असले, तरी कसोटी सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. सध्याच्या डब्ल्यूटीसी 2025-27 च्या हंगामात वेस्ट इंडिजने आपले तिन्ही कसोटी सामने गमावले आहेत. दोन्ही संघांमधील ताकदीतील प्रचंड तफावत पाहता, भारत किती फरकाने विजय मिळवणार, इतकाच येथे औत्सुक्याचा मुद्दा असणार आहे.
वेस्ट इंडिजसाठी पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच परिस्थिती अत्यंत बिकट असेल, हे स्पष्ट झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जमैका येथे झालेल्या दिवस-रात्र कसोटीत संघाने इतिहासातील निचांकी अवघ्या 27 धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली होती. त्या धक्यातून सावरण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही तत्काळ उपाय दिसत नाही.
दुखापतींमुळे शामर जोसेफ आणि अल्झारी जोसेफ यांसारख्या वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीमुळे गोलंदाजीची धार कमी झाली आहे. त्यामुळे पाहुण्या संघाला आपल्या दोन डावखुर्या फिरकीपटूंवर अधिक अवलंबून राहावे लागेल. वेगवान गोलंदाज सील्स, फिरकीपटू जोमेल वॉरिकन यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. या दौर्यासाठी क्रेग ब्रॅथवेटला वगळलेल्या वेस्ट इंडिजने, टॅगेनरीन चंद्रपॉल आणि अॅलिक अथानाझे यांना संघात पाचारण केले आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये भारताने घरच्या मैदानावर अखेरचा कसोटी सामना खेळल्यापासून संघात बरेच बदल झाले आहेत. महान फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने निवृत्ती घेतली आहे. मोहम्मद शमीदेखील संघात नाही; पण तरीही भारताची ताकद कमी झालेली नाही.
मायदेशातील चार कसोटी सामन्यांपैकी पहिल्या सामन्यासाठी हिरवीगार खेळपट्टी तयार केल्याने, भारत फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या तयार करण्याच्या आपल्या पारंपरिक धोरणापासून दूर जात असल्याचे संकेत मिळत आहेत. याच धोरणामुळे गेल्या हंगामात न्यूझीलंडविरुद्ध भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, ध्रुव ज्युरेल (यष्टिरक्षक), एन. जगदीशन (यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल, बी. साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, नितीशकुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
विंडीज : रोस्टन चेस (कर्णधार), केव्हलॉन अँडरसन, अॅलिक अथानाझे, जॉन कॅम्पबेल, टॅगेनरीन चंद्रपॉल, शाई होप (यष्टिरक्षक), टेविन इम्लाच (यष्टिरक्षक), ब्रँडन किंग, जस्टिन ग्रीव्हज, योहान लेने, खारी पिएर, जोमेल वॉरिकन, जेडेन सील्स, अँडरसन फिलिप, जेडिया ब्लेड्स.
सामन्याची वेळ : सकाळी 9.30 वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क, जिओ-हॉटस्टार ॲप