दुबई : वृत्तसंस्था
आशिया चषकातील सुपर-4 लढतीत भारत-पाकिस्तान हे कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने भिडत असून येथेही भारत पहिल्या सामन्याप्रमाणेच पाकिस्तानवर जोरदार वर्चस्व गाजवेल, अशी अपेक्षा आहे. शेकहँड मुद्द्यावरून निर्माण झालेला ताणतणाव, त्यानंतर पाकिस्तान संघाने घेतलेली टोकाची भूमिका आणि त्याचे विविध स्तरावर उमटत आलेले संतप्त पडसाद, या सार्या पार्श्वभूमीवर, ही लढत दोन्ही संघांचा आणखी कस घेणारी ठरेल, हे निश्चित आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार,रात्री 8 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
पाकिस्तानचा संघ आपल्या अनिश्चित खेळासाठी ओळखला जातो, पण सध्याच्या संघात फलंदाजी लाईनअपमध्ये दर्जेदार खेळाडूंचा अभाव दिसत आहे. विशेषतः संथ गोलंदाजांचा सामना करताना ते बरेच चाचपडत आले आहेत. जावेद मियाँदाद, इंझमाम-उल-हक, सलीम मलिक आणि इजाज अहमद यांसारखे महान फलंदाज देणार्या या देशासाठी सध्याच्या खेळाडूंची फलंदाजीची शैली फारशी प्रभावी नाही. मागील दोन सामन्यांत शून्यावर बाद होणारा सलामीवीर सईम अयुबवर आणखी दडपण निर्माण झाले आहे. सईम अयुबला सईद अन्वरसारखा फलंदाज व्हायचे होते, पण तो सईद अजमलसारखा गोलंदाज बनत आहे, अशा विनोदी प्रतिक्रिया त्याच्या कामगिरीबद्दल ऐकायला मिळत आहेत. याचे कारण म्हणजे त्याने फलंदाजीपेक्षा गोलंदाजीत अधिक यश मिळवले आहे.
या स्पर्धेत सूर्यकुमार यादव फलंदाज आणि कर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला झेल घेताना डोक्याला दुखापत झाल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र, तो लवकरच बरा होईल, असे संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी सांगितले. भारताच्या गोलंदाजांची कामगिरी पाहता, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग ओमानच्या खेळाडूंसमोर प्रभाव पाडू शकले नाहीत. मात्र, आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती हे दोघेही संघात परतणार असल्याने गोलंदाजी अधिक मजबूत होईल. दुबईच्या मैदानावर संथ गोलंदाजांना मदत मिळत असल्याने, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांच्यावर मुख्य जबाबदारी असेल. जर अक्षर पटेल तंदुरुस्त नसेल, तर त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर किंवा रियान परागला संधी मिळू शकते.
आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा सामना नेहमीच उत्कंठावर्धक असतो. रविवारी दुबईमध्ये होणार्या ‘सुपर-4’ च्या सामन्यातही असाच थरार पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवची या लढतीत पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजीवर भिस्त असणार आहे. गेल्या रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांनी हस्तांदोलन केले नव्हते, त्यामुळे वादंग निर्माण झाले. आता आजच्या लढतीतही भारतीय संघ हीच भूमिका कायम ठेवण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानकडून सध्या फक्त फखर जमान आणि शाहिन शाह आफ्रिदी हे दोघेच खेळाडू प्रभावी कामगिरी करू शकतात. शाहिनला अभिषेक शर्माविरुद्ध चांगला स्पेल टाकावा लागेल. गेल्या सामन्यात पाकिस्तानने तिसरा फिरकी गोलंदाज सुफियान मुकीम याला संधी दिली होती, पण या सामन्यात वेगवान गोलंदाज हॅरिस रौफला खेळवण्याची शक्यता आहे.
भारताकडून संजू सॅमसनने ओमानविरुद्ध अर्धशतक झळकावले होते, मात्र शुभमन गिल लवकर बाद झाल्यास तो तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करेल, अशी शक्यता कमी आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची शक्यता आहे. तसेच, अभिषेक शर्मा लवकर बाद झाल्यास, डावखुरा फलंदाज तिलक वर्मा तिसर्या क्रमांकावर येईल. शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या, शिवम दुबे यांना अजून चांगल्या खेळीची संधी मिळालेली नाही. तरीही, भारताचे अव्वल चार फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना करू शकतात. सूर्यकुमार यादव आणि त्याचा संघ बाहेरील दबावाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.