

नवी दिल्ली; (पीटीआय) : पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ (BCCI) दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांवर सरकारच्या भूमिकेचे काटेकोरपणे पालन करत आहे, असे ‘आयपीएल’चे अध्यक्ष अरुण धुमल यांनी शुक्रवारी सांगितले.
मे महिन्यात पहलगाममध्ये 26 पर्यटकांच्या झालेल्या हल्ल्यानंतर आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान दुबईमध्ये पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात आमने-सामने येणार आहेत.
‘प्लेकॉम बिझनेस ऑफ स्पोर्टस् कॉनक्लेव्ह’मध्ये पत्रकारांशी बोलताना धुमल म्हणाले, सरकारने हे स्पष्ट केले आहे की, आम्ही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही, फक्त बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच खेळू. आम्ही सरकारच्या याच सल्ल्याचे पालन करत आहोत.
ड्रीम11 या गेमिंग प्लॅटफॉर्मने प्रायोजकत्व सोडल्यानंतर निर्माण झालेल्या पोकळीबद्दल धुमल म्हणाले की, जे व्हायचे ते झाले. आम्ही नवीन प्रायोजक शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि पुढील 2-3 आठवड्यांत याबाबत माहिती मिळेल. भारतीय सरकारने ‘रिअल-मनी गेमिंग’वर बंदी घातल्यामुळे ‘बीसीसीआय’ने ड्रीम11 सोबतचा करार संपुष्टात आणला आहे.