India vs Pakistan hockey :
भारत आणि पाकिस्तान यांच्यात मलेशियामध्ये सुरू असलेल्या सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे ज्युनिअर संघ एकमेकांना भिडले. ऑपरेशन सिंदूरच्या आणि बीसीसीआयने नो हँड शेकच्या पवित्र्यानंतर या सामन्याकडं सर्वांच लक्ष होतं. मात्र राष्ट्रगीतानंतर आणि सामन्यानंतरही दोन्ही संघातील खेळाडूंनी हँडशेक आणि हाय-फाय देत एक नवा ट्रेंड सेट केला. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामना ३-३ असा बरोबरीत संपला.
सुल्तान जोहोर कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. दोन कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या संघात सामना म्हटलं की काही ना काही ड्रामा होतोच. मात्र या सामन्यावेळी सामान्य चित्र दिसलं. सामन्यापूर्वी झालेल्या राष्ट्रगीतानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंना हाय फाय देत खिलाडूवृत्ती जपली. त्यानंतर अटी-तटीच्या सामन्यानंतरही दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांना हस्तांदोलन केलं.
काही आठवड्यापूर्वीच झालेल्या आशिया कप सामन्यात भारत पाकिस्तान तीनवेळा एकमेकांना भिडले. मात्र त्यावेळी भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन टाळलं होतं. यावरून बराच वाद झाला होता. हा वाद मैदानावर देखील दिसला.
हँडशेकचा वाद फक्त सामन्यापुरता मर्यादित राहिला नाही तर तो बक्षीस वितरण सोहळ्यापर्यंत पोहचला. मोहसीन नक्वी पाकिस्तानी मंत्री जे आशिया क्रिकेट काऊन्सीलचे अध्यक्ष देखील आहेत. त्याच्या हस्ते भारतीय संघानं आशिया कपची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन हॉटेलवर गेले. त्यामुळं भारतीय संघाला विजेत्या ट्रॉफीविनाच भारतात परतावं लागलं होतं.
मात्र सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धेत चित्र वेगळं दिसलं. पाकिस्तान हॉकी फेडरेशननं आपल्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना भारतीय खेळाडूंसोबत मैदानावरील कोणताही वाद टाळावा अशी सूचना दिली होती. त्यांना फक्त खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देण्यात आला होता.