India vs Pakistan Suryakumar Yadav press conference
कोलंबो: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आज (दि. १४) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सूर्यकुमारने केवळ मैदानातील रणनीतीवरच भाष्य केले नाही, तर आपल्या खास शैलीत मिश्किल उत्तरे देऊन पत्रकारांची मनेही जिंकली. "आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार होतो आणि आता आमचे पूर्ण लक्ष फक्त क्रिकेटवर आहे," असे त्याने ठामपणे सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून या सामन्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना सूर्यकुमार म्हणाला, "भारतीय संघ आपल्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच तयारी करत होता. आमच्या फ्लाईट्स बुक होत्या आणि आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज होतो."
पाकिस्तानचा संघ गेल्या आठवड्याभरापासून श्रीलंकेत असल्याने त्यांना इथल्या वातावरणाचा अधिक सराव असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. यावर सूर्याने स्पष्ट केले की, "भारतीय संघाने श्रीलंकेत अनेक द्विपक्षीय मालिका खेळल्या आहेत. त्यामुळे येथील परिस्थिती आमच्यासाठी नवीन नाही. आम्ही इथल्या खेळपट्ट्या आणि वातावरणाशी पूर्णपणे परिचित आहोत."
पाकिस्तानच्या कर्णधाराने अभिषेक शर्माला खेळवण्याबाबत इच्छा व्यक्त केल्याचे समजताच सूर्याने हसत उत्तर दिले, "जर पाकिस्तानला वाटत असेल की आम्ही उद्या अभिषेकला खेळवावे, तर ठीक आहे, आम्ही त्याला खेळवू."
सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर दोन्ही संघांत 'हँडशेक' (हस्तंदोलन) होणार का? या प्रश्नावर सूर्याने वातावरण हलके करत म्हटले, "हे सर्व सामन्याच्या वेळेवर सोडून द्या. तुम्ही आज शांत झोप घ्या आणि उद्या काय होते ते पहा."
संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाज घ्यावा की फिरकीपटू, या प्रश्नावर कर्णधाराने प्रांजळ कबुली दिली. तो म्हणाला, "आमच्याकडे दर्जेदार फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजही आहेत. या दोघांपैकी एकाची निवड करणे सोपे नाही, हा खरोखरच कठीण निर्णय आहे." उस्मान तारिकच्या आव्हानाबद्दल विचारले असता, संघ कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणारा हा सामना दोन्ही संघांच्या गुणतालिकेतील स्थानासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.