Asian Champions Trophy 2026 India vs Japan Final : भारतीय पुरुष हॉकी संघाने अपराजित घोडदौड कायम ठेवत एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जपानचा ४-१ असा धुव्वा उडवला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. मोहालीच्या मैदानावर रंगलेल्या या रोमांचक सामन्यात सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये तुफानी खेळ करत गोलचा पाऊस पाडला. या दिमाखदार विजयासह भारताने तब्बल सहाव्यांदा (२०११, २०१६, २०१८, २०२३, २०२४ आणि २०२६) एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे.
सामन्याची सुरुवात जपानसाठी दमदार झाली. पहिल्याच क्वार्टरमध्ये तिसऱ्या मिनिटाला काझुमासा मात्सुमोतो याने मैदानी गोल करत जपानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला लय सापडत नव्हती. जपानने दुसऱ्या क्वार्टरमध्ये लागोपाठ पेनल्टी कॉर्नर मिळवले, परंतु भारतीय बचावफळीने त्यांचा प्रयत्न उधळून लावला.या महामुकाबल्यात भारताकडून शिलानंद लाक्रा, दिलप्रीत सिंग, जुगराज सिंग आणि विवेक सागर प्रसाद यांनी प्रत्येकी एक गोल डागला.
भारतीय हॉकी संघाचा स्टार मिडफिल्डर हार्दिक सिंगसाठी हा सामना अत्यंत भावुक आणि महत्त्वाचा ठरला. हार्दिकने आज आपला २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. विशेष म्हणजे, ज्या मोहालीच्या मैदानावर १३ वर्षांपूर्वी तो एक 'बॉल बॉय' म्हणून उभा राहायचा, त्याच मैदानावर आज त्याने भारतासाठी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळण्याचा पराक्रम केला. सामन्यानंतर त्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
अंतिम सामन्याआधी झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या (कांस्यपदक) लढतीत आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मलेशियाने दक्षिण कोरियाचा ५-२ असा पराभव केला. मलेशियाकडून अबू कमाल अरझाई याने दोन गोल डागले.
पंजाबच्या भूमीत पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही. साखळी फेरीत भारताने बांगलादेशचा १३-०, चीनचा ५-२, जपानचा ४-१, मलेशियाचा ४-१ आणि दक्षिण कोरियाचा ८-० असा धुव्वा उडवला होता. त्यानंतर उपांत्य फेरीत पुन्हा एकदा कोरियाला ८-१ ने लोळवत अंतिम फेरीत धडक मारली होती.